लातूर : मांजरा धरणात एकाच दिवसात तिपटीने पाणीसाठा वाढला

विकास गाढवे
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

लातूर शहरासह उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील काही शहरे व गावांच्या पाणी पुरवठ्यासाठी उपयुक्त असलेल्या धनेगाव (जि. बीड) येथील मांजरा धरणात मागील चोवीस तासात तब्बल तीन दशलक्ष घनमीटर पाणी जमा झाले आहे.

लातूर : लातूर शहरासह उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील काही शहरे व गावांच्या पाणी पुरवठ्यासाठी उपयुक्त असलेल्या धनेगाव (जि. बीड) येथील मांजरा धरणात मागील चोवीस तासात तब्बल तीन दशलक्ष घनमीटर पाणी जमा झाले आहे.

धरणाचा पाणलोट क्षेत्रात रविवारी (ता. २०) रात्रीपासून सोमवारी (ता. २१) सकाळपर्यंत झालेल्या जोरदार पावसामुळे पाणीसाठी वाढ झाली असून, मागील काही दिवसात दररोज एक दशलक्ष घनमीटरने वाढत असलेला पाणीसाठा एकाच दिवसात तिपटीने वाढला आहे. यामुळे टंचाईचा सामना करत असलेल्या लातूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. दोन वर्षापासून मांजरा धरणात पावसाचे पाणी आले नव्हते. यंदाच्या पावसाळ्यातही पाणी आले नाही.

धरणातील पाणी तळ गाठत असतानाच ११ ऑक्टोबरच्या रात्रीपासून धरणात पाणी येण्यास सुरवात झाली. पहिल्याच पावसात एक दलघमी (दशलक्ष घनमीटर) पाणी आले. त्यानंतर मागील तीन दिवसात तीन दलघमीटर पाणी आले. धरणाच्या परिसरात पावसाचा जोर कायम राहिल्याने पाण्याचा येवा वाढतच होता.

यात रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढताच धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली. यातूनच सोमवारी सकाळी सातपर्यंत धरणात १०.३१४ दलघमी पाणीसाठा आला आहे. रविवारी सकाळी सात वाजता हा पाणीसाठा ७.००९ दलघमी होता. दरम्यान माकणी (जि. उस्मानाबाद) येथील निम्न तेरणा प्रकल्पातही मागील चोवीस तासात तीन दलघमी पाणी आले आहे. रविवारी सात वाजता प्रकल्पात २०.६२६ दलघमी पाणीसाठा होता. तो सोमवारी सकाळी सात वाजता २३.२२३ दलघमी झाल्याचे जलसंपदा विभागाच्या सुत्रांनी सांगितले.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water level of Manjara Dam increase in just a day