ठिबक असेल तरच मिळणार धरणाचे पाणी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

लातूर - ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करून पिकांना पाणी दिले जाणार असेल तरच शेतकऱ्यांना धरण किंवा प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी मिळणार आहे. धरणासह विविध मध्यम, लघु, साठवण तलावांतून तसेच कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांतून पाणी घेण्यासाठी सरकारने सूक्ष्म सिंचन सक्तीचे केले आहे. सूक्ष्म सिंचनाशिवाय पंप किंवा मोटारीने पाणी उपसा केल्यास ती जप्त करण्यात येणार असून प्रसंगी पाणी उपसा करणाऱ्या अन्य साधनांचा वीजपुरवठाही खंडित करण्यात येणार आहे. 

लातूर पाटबंधारे विभाग क्रमांक दोनच्या कार्यकारी अभियंत्याने तसे प्रसिद्धिपत्रक काढले आहे. त्यानुसार त्यांनी ठिबक व तुषार आदी सूक्ष्म सिंचनाचा वापर न करता पिकांना पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांचा पाणी परवाना रद्द करण्याचाही इशारा दिला आहे. अपुरा पाऊस व दुष्काळामुळे पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. यातून पाणी अडवून ते जिरवण्यासोबत पाण्याचा काटकसरीने वापर करणे, ही काळाजी गरज बनली आहे. यामुळे सरकारने पाण्याची काटकसर करणाऱ्या सूक्ष्म सिंचनाला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी विविध धरणे तसेच प्रकल्पांतून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी देताना काही प्रमाणात प्रवाही तर ठराविक प्रमाणात सूक्ष्म सिंचनाने पिकांना पाणी देण्याची सक्ती केली आहे. पाटबंधारे विभागाने त्यांच्याकडील विविध सिंचन प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात सूक्ष्म सिंचनाचे उद्दिष्ट निश्‍चित करूनच शेतकऱ्यांना पाणी देण्याचे धोरण अंगीकारले आहे. यामुळेच सर्व पिकांना शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचनाद्वारे पाणी देणे सक्तीचे करण्यात आले आहे. सूक्ष्म सिंचनाचा वापर न करणाऱ्या शेतकऱ्यांचा पाणी परवाना रद्द करण्यात येणार असून पाण्याचा उपसा करणाऱ्या त्यांच्या मोटारी व अन्य यंत्रसामग्री महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम सन 1976 च्या कलम 51 (क) व कलम 97 (अ) नुसार जप्त करण्यात येणार आहे. यासोबत अशा यंत्रसामग्रीचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. पाण्याच्या काटकसरीसाठी पाटबंधारे अंगीकारलेल्या या धोरणाला शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे. 

Web Title: water only if it is drip