'जुगाड'करून मिटवली पाण्याची चणचण

आदित्य वाघमारे
सोमवार, 8 एप्रिल 2019

गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीचे पाणी खोल गेल्याने महिन्यातून एकदाच नळाला पाणी येते; मात्र पाझर तलाव खोदण्याचा "जुगाड' करून त्यात गावाबाहेरील तलावाचे पाणी आणले आणि विहिरीला संजीवनी मिळाली.

औरंगाबाद - गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीचे पाणी खोल गेल्याने महिन्यातून एकदाच नळाला पाणी येते; मात्र पाझर तलाव खोदण्याचा "जुगाड' करून त्यात गावाबाहेरील तलावाचे पाणी आणले आणि विहिरीला संजीवनी मिळाली. या विहिरीतून 22 दिवसांना होणारा पाणीपुरवठा आता 12 दिवसांवर आला आहे. कागजीपुऱ्यातील गावकऱ्यांनी तलावात मोटारी न टाकण्याचा निर्धार केल्याने या मोहिमेला बळकटी मिळाली आहे.

दोन महिन्यांपासून ग्रामपंचायत टॅंकरचा प्रस्ताव पाठवत आहे. शासनस्तरावर हालचाल होत नसल्याने हातावर हात देऊन न बसता कागजीपुऱ्यातील गावकऱ्यांनी स्वतःच पाण्याच्या टंचाईवर मात करण्याचे ठरवले. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे पाणी एका पातळीला आले, की त्यातून गावाच्या टाकीत पंपिंग करून पिण्यासाठी दिले जाते. या विहिरीत आवश्‍यक जलसाठा येण्यासाठी किमान 20 दिवस वाट पाहावी लागत असे. हा कालावधी वाढतच चालल्याने संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन या पुरातन विहिरीलगत पाझर तलाव करून त्यात साठवण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार साधारण दोन लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या तलावाचे खोदकाम करण्यात आले. त्यात गावाच्या हौज-ए-नीलम या तलावाचे पाणी आणून सोडण्यात आले. या पाझर तलावातून झिरपणारे पाणी भूगर्भातून विहिरीच्या पाझरांना मिळाले आणि पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे 22 दिवसांनी येणारे पाणी आता 12 दिवसांवर आले आहे.

तलावातील मोटारी काढण्यावर एकमत
हौज-ए-नीलम या कागजीपुरा गावातील तलावात शेतकऱ्यांच्या आणि परिसरात वीटभट्टी चालविणाऱ्यांच्या मोटारी आहेत. मोटारींच्या माध्यमातून खेचले जाणारे पाणी वेगाने जात असल्याने तलावातील साठा लक्षात घेता, यंदा मोटारी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर शेतकऱ्यांनी आणि भट्टी मालकांनीही सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या मोटारी काढून घेतल्या. त्यामुळे गावाला पिण्यासाठीचे पाणी उपलब्ध झाले आहे.

गावात 22 दिवसांना एकदा पाणी येत असे. विहिरीलगत पाझर तलाव खोदल्याने विहिरीचे पाणी वाढले आणि आता पाणी पुरवठ्याचा कालावधी 12 दिवसांवर आला आहे. गावकऱ्यांनी मोटारी काढून घेत आपले कर्तव्य करून गावावर घोंगावणारे जलसंकट टाळण्याचा प्रयत्न केला आहे.
- झिशान मोहम्मद, रहिवासी, कागजीपुरा.

Web Title: Water Percolation Pond Well