शहरात पाणीबाणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

औरंगाबाद - जायकवाडी ते औरंगाबाद शहरादरम्यान पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम मंगळवारी (ता. सात) सकाळी नऊ वाजेपासून सुरू करण्यात आले. पाच मोठ्या, तर 30 छोट्या गळत्यांची दुरुस्ती सुरू असून, दुरुस्तीनंतर पाण्याच्या टाक्‍या भरण्यासाठी किमान 12 ते 13 तास लागणार असल्याने पुढील चार-पाच दिवस तरी शहरातील पाणीपुरवठा विस्कळित राहण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, मंगळवारी नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. काहींनी खासगी टॅंकरचा आधार घेतला, तर काहींना जारचे पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागली.

शहराला 700 आणि 1400 मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. उन्हाचा पारा वाढू लागला, की जुन्या झालेल्या जलवाहिनी फुटण्याच्या घटनांत वाढ होते. मनपाने केलेल्या सर्वेक्षणानुसार जायकवाडी, नक्षत्रवाडी, फारोळा व अन्य दोन अशा पाच ठिकाणी मोठ्या, तर 30 छोट्या गळत्या जलवाहिनीला लागल्या आहेत.

या गळत्यांमधून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात होते. त्यामुळेच गळत्या दुरुस्तीसाठी 24 तासांचा शटडाऊन घेतला. सकाळी 9 वाजेपासून प्रत्यक्षात दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. बुधवारी (ता. आठ) सकाळी 9 वाजेपर्यंत हे काम पूर्ण होण्याची प्रशासनाकडून अपेक्षा व्यक्‍त करण्यात आली आहे. यानंतर जायकवाडीहून फारोळापर्यंत पाणी येण्यासाठी बारा तास आणि अंतर्गत जलवाहिन्यांद्वारे जलकुंभ भरण्यासाठी आठ तासांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे गुरुवारी रोटेशननुसार ज्यांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन होते, त्यांना पाणीपुरवठा करण्यात येईल; मात्र ज्या भागाचा रोटेशननुसार मंगळवार आणि बुधवारचा पाणीपुरवठ्याचा दिवस होता त्या भागातील नागरिकांना पुढच्या रोटेशनची वाट पाहावी लागणार आहे. हे दुरुस्तीचे काम महापालिकेच्या यांत्रिक विभागानेही हाती घेतले असल्याचे पाणीपुरवठा विभागातील सूत्रांनी सांगितले. सिडको एन-5, कोटला कॉलनी येथील पाण्याच्या टाक्‍यांवरून टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येतो; मात्र शटडाउनमुळे टॅंकरनेही पाणीपुरवठा झाला नाही. यामुळे नागरिकांना खासगी टॅंकरने विहिरी व बोअरचे पाणी विकत घ्यावे लागले. पिण्याच्या पाण्यासाठी जारचा वापर करण्यात आला.

शुक्रवारीदेखील पाण्यासाठी अशीच भटकंती करण्याची वेळ येणार आहे, असे चित्र आहे.

जुन्या शहराला दिलासा
जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या भागांमध्ये पाणीबाणी सुरू असली तरी हर्सूल तलावातून पाणीपुरवठा होत असलेल्या जुन्या शहरातील आठ वॉर्डांना काही प्रमाणात पाणीपुरवठा सुरू आहे. शहागंज व दिल्लीगेट येथील पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा होणाऱ्या शहागंज, एस.टी. कॉलनी, रोजाबाग, हडको कॉर्नर, दिल्लीगेट, राजाबाजार, हर्षनगर, फाजलपुरा या भागातील नागरिकांना हर्सूल तलावामुळे दिलासा मिळाला.

Web Title: water problem in city