लातूरला रेल्वेने पाण्यासाठी तीन ठिकाणांची चाचपणी

2016 मध्ये लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा झाला होता.
2016 मध्ये लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा झाला होता.

लातूर: जिल्ह्यात परतीच्या पावसाची सर्वांनाच खात्री असली, तरी जिल्हा प्रशासनाने पाऊस न पडल्यास शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पुढील काळात करावयाच्या उपाययोजनांची तयारी ठेवली आहे. यात मिरजसोबत उस्मानाबाद व पंढरपूर येथूनही रेल्वेने पाणी आणण्यासाठी चाचपणी केली जात आहे. मांजरा धरणातील सध्याचा पाणीसाठा पाहता शहराला येत्या एक ऑक्‍टोबरपासून नळाद्वारे सुरू असलेला पाणीपुरवठा बंद करावा लागणार आहे. धरणातीलच पाणी टॅंकरने पुरवठ्यासाठी राखून ठेवण्यात येणार असून एक ऑक्‍टोबरपासून शहरात टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करावा लागणार आहे. 


उस्मानाबाद शहराची उजनी धरणातून पाणी योजना असून या योजनेच्या विस्ताराचे काम सध्या सुरू आहे. विस्तारित पाणी योजनेतून जादा आठ ते 16 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार असून हे काम डिसेंबरअखेर पूर्ण झाल्यास लातूरसाठी योजनेतून आठ दशलक्ष लिटर पाणी मिळण्याची आशा आहे. रेल्वे बोगीत पाणी सोडण्यासाठी मिरज रेल्वेस्थानकापर्यंत 2016 मध्ये व्यवस्था उभारण्यात आली आहे.

पंढरपूर आणि उस्मानाबाद येथून रेल्वेने पाणी आणावयाचे झाल्यास तेथील जलशुद्धीकरण केंद्रापासून रेल्वे बोगीत पाणी भरण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करावी लागणार आहे. गरज पडल्यानंतर कोणत्या पर्यायातून रेल्वेने पाणी आणायचे, याचाही विचार प्रशासनाने सुरू ठेवला आहे. शहराची सध्याची लोकसंख्या पाच लाख असून पाण्याची दररोजची मागणी सहा कोटी सात लाख लिटर आहे. सध्या दररोज तीन कोटी लिटर पाणीपुरवठा होत आहे.

ई बंधाऱ्यात सध्या दीड फूट पाणी असले तरी त्याचा वापर शेतीसाठी सुरू आहे. नागझरी बंधाऱ्यात काहीच पाणी शिल्लक नाही. मांजरा धरणावर लातूरसह लातूर एमआयडीसी, अंबाजोगाई, कळंब, केज, धारूर, मुरूड व शिराढोणच्या पाणीयोजना आहेत. जुलैमध्ये सर्व योजनांतून (बाष्पीभवनासह) 2.29 दशलक्ष घनमीटर पाण्याची उचल केली आहे. त्यानुसार एक ऑक्‍टोबर रोजी मांजरा धरणात तीन दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक राहण्याची शक्‍यता आहे. 

रेल्वेच्या पाण्याचे संभाव्य नियोजन 
पाणी योजना - लातूरपासून अंतर - रेल्वेच्या संभाव्य फेऱ्या - उपलब्ध होणारे पाणी 
उस्मानाबाद - 80 - 3 - 75 लाख लिटर 
पंढरपूर - 170 - 2 - 50 लाख लिटर 
मिरज - 300 - 1 - 25 लाख लिटर 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com