जायकवाडीच्या सोळा दरवाजांतून सोडले पाणी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

पैठण, (जि. औरंगाबाद) : जायकवाडी धरणात नाशिक, नगर जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे धरणाचे 27 पैकी 16 दरवाजे गुरुवारी (ता. 26) पहाटे साडेचारच्या सुमारास उघडण्यात आले. या दरवाजांच्या उंचीत सायंकाळी वाढ केल्यामुळे 44 हजार 16 क्‍युसेक पाणी सांडव्याद्वारे गोदापात्रात सोडण्यात आले आहे. दरम्यान, गोदापात्रात जास्त प्रमाणात पहिल्यांदाच पाणी सोडल्यामुळे धरणाच्या पायथ्याखाली असलेला पूल पाण्यात बुडाला असून, या पुलावरून पाणी वाहत आहे.

बुधवारी (ता. 25) धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्यामुळे आधीच शंभर टक्के पाणीसाठा असलेल्या धरणाची शंभर टक्के पातळी ओलांडल्यामुळे धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय तातडीने घेण्यात आला. बुधवारी रात्री साडेनऊला दहा दरवाजे एक फूट सहा इंचाने उचलून पाण्याचा विसर्ग गोदापात्रात सुरू केला. यानंतर गुरुवारी (ता. 26) पहाटे साडेचारच्या सुमारास पुन्हा दरवाजे उघडण्यात आले. सद्यःस्थितीत एक फूट सहा इंचांनी दरवाजे क्रमांक 10, 16, 21, 14, 23, 12, 25, 11, 13, 24, 15, 22, 17, 20 यातून पाणी सुरू आहे. यानंतर सायंकाळी पाच वाजता धरण व्यवस्थापनाने सोळापैकी चार दरवाजे तीन फूट, तर बारा दरवाजे अडीच फुटाने वाढवून पाणी सोडले आहे. जलविद्युत निर्मिती केंद्रातूनही पाणी सुरूच आहे. 

धरण, तालुका प्रशासन सतर्क 
दरम्यान, अचानक मोठा पाऊस झाल्यामुळे नाशिक, नगर जिल्ह्यांतून वेगाने जायकवाडी धरणात पाणी येण्यास सुरवात झाली. यामुळे धरण व तालुका प्रशासनाने तातडीने गोदापात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेऊन अंमलबजावणी केली. पाणी वाढत असल्यामुळे जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे, उपअभियंता अशोक चव्हाण, सहायक अभियंता बुद्धभूषण दाभाडे, संदीप राठोड यांनी धरणावर ठाण मांडून विशेष नियंत्रण ठेवले आहे. तहसीलदार महेश सावंत यांनी गोदाकाठच्या गावांना सोशल मीडिया, महसूल यंत्रणेच्या माध्यमातून संपर्क साधून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Release From Jayakwadi Dam