लातूर ः सकाळ रिलीफ फंडातून झालेल्या कामांमुळे महादेववाडी जलमय

जलील पठाण
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

मराठवाडा आणि लातूर जिल्ह्यातील अनेक गावात 'सकाळने' रिलीफ फंडातून निधी दिला आणि अनेक गावे दुष्काळमुक्तीच्या दिशेने झेपावली. औसा तालुक्यात यंदा पाऊस झालाच नाही त्यामुळे आतापर्यंत या जलसंधारण कामांच्या ठिकाणी पाणी साचले नव्हते, मात्र रविवारी व सोमवारी (ता.20, 21) परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आणि सकाळ रिलीफ फंडातून झालेले काम पाणीदार झाले. 

औसा(जि. लातूर) : सकाळ रिलीफ फंडाने दुष्काळ मुक्तीच्या दिशेने दमदार पाऊल उचलले आहे. याच धर्तीवर मराठवाडा आणि लातूर जिल्ह्यातील अनेक गावात 'सकाळने' रिलीफ फंडातून निधी दिला आणि अनेक गावे दुष्काळमुक्तीच्या दिशेने झेपावली. औसा तालुक्यात यंदा पाऊस झालाच नाही त्यामुळे आतापर्यंत या जलसंधारण कामांच्या ठिकाणी पाणी साचले नव्हते, मात्र रविवारी व सोमवारी (ता.20, 21) परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आणि सकाळ रिलीफ फंडातून झालेले काम पाणीदार झाले.

तालुक्यातील महादेववाडी या गावात सकाळ रिलीफ फंडातून नाला खोलीकरण आणि तलावातील गाळ उपसा करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी झालेल्या दमदार पावसाने वाहून जाणारे नाल्यातील पाणी अडले आहे. तलावातील खड्डे पाण्याने भरले आहेत. याचा आजूबाजूच्या कूपनलिका आणि विहिरींना पाणी येणे सुरू झाले आहे. 

औसा तालुक्याच्या नशिबी गेल्या पाच सहा वर्षांपासून दुष्काळच आहे. दुष्काळ आणि तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसत असलेल्या या भागाला पाणीदार करण्यासाठी अलमला, एकंबीवाडी, मातोळा आदी भागात सकाळने एक जलचळवळ उभी केली. लाखो लिटर वाया जाणारे पावसाचे पाणी अडविले गेले तर त्याच प्रमाणात नाला खोलीकरण केल्याने पावसाचे पाणी साचले, तर तलावातील गाळ उपसा केल्याने शेकडो हेक्टर जमिनी सुपीक होण्याबरोबरच पावसाचे पडलेले पाणी जमिनीत मुरले पाण्याची पातळीही वाढली. सकाळच्या या मदतीमुळे मातोळा सारख्या मोठ्या गावात लाखों रुपये लोकवर्गणी जमा झाली.

 नाला सरळीकरण आणि खोलीकरण होऊन पावसाचा पडलेला थेंब जमिनीत मुरू लागला आणि हळूहळू गावातील पाण्याचे दुर्भिक्ष संपण्यास सुरुवात झाली. याच धर्तीवर यंदा महादेववाडी या गावात सकाळ रिलीफ फंडातून तलावातून गाळ उपसा आणि नाला सरळीकरण व खोलीकरण करण्यात आले आहे आणि या नाल्यात पाणी अडविण्यासाठी बांध टाकण्यात आले आहेत, तर तलावात मोठमोठे चौकोनी खड्डे करण्यात आले आहेत. दोन दिवसांपुर्वी झालेल्या पावसाने नाले भरले आहेत, तर तलाव पत्रातील खड्डेही भरले आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water reservior increase in mahadeowadi because of work done by sakal relief fund