शासकीय रुग्णालयात रुग्णासह डॉक्टरांना पाणी मिळेना 

तानाजी जाधवर
सोमवार, 26 मार्च 2018

नगरपालिकेकडून शासकीय रुग्णालयाला थेट पाणी देणे शक्य नाही. नवीन टाकी बांधल्यानंतरच त्यांचा प्रश्न निकाली निघेल. तोपर्यंत त्यांचे टँकर भरुन देण्यास आम्ही तयार असल्याचे नगरपालिकेचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यानी सांगितले. 
या दोन्ही यंत्रणेमध्ये समन्वय नसल्याने शासकीय रुग्णालयातील रुग्णांना पाणीटंचाई सहन करावी लागत आहे

उस्मानाबाद - उन्हाळ्याची चाहुल लागताच शासकीय रुग्णालयामध्ये पाणीटंचाईला सूरुवात झाली आहे. गेल्या एक दिड महिन्यापासून पाण्याचे नियोजन होत नसल्याने अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यातही आलेल्या रुग्णांना एवढेच नव्हे तर तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनाही पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. 

शासकीय रुग्णालयामध्ये जिल्ह्यातून लोक तपासणी व उपचारासाठी येतात, त्यामुळे त्या ठिकाणी सर्व सुविधा असणे हे गरजेचे असते. किमान पिण्याची पाण्याची सोय निर्माण करुन देणे रुग्णालयाची जबाबदारी आहे.  रुग्णालयाच्या परिसरात चार बोअर असूनही त्यातील एक बंद पडले असून इतरही बोअर दोन तासाच्या पुढे सूरु राहत नाहीत अशी स्थिती आहे. त्यामुळे एकंदरीतच एवढ्या पाण्यावर संपुर्ण रुग्णालयाचा गाडा कसा चालणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातही उन्हाळ्याची आता सूरुवात झाली अजूनही तीन महिने पाण्याची समस्या अधिक वाढणार असल्याने यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याच्या भावना रुग्णासह येथील अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. 

याविषयी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ, राजाभाऊ गलांडे  यांना विचारले असता, नगरपालिकेकडे यासंदर्भात पाठपुरावा सूरु आहे.पाणीटंचाईची कल्पना असल्याने गेल्या सहा महिन्यापासून नगरपालिकेशी पत्रव्यवहार केला आहे, पण अद्याप कोणताही प्रतिसाद त्या यंत्रणेकडून मिळालेला नसल्याचे श्री. गलांडे यानी सांगितले. 

नगरपालिकेकडून शासकीय रुग्णालयाला थेट पाणी देणे शक्य नाही. नवीन टाकी बांधल्यानंतरच त्यांचा प्रश्न निकाली निघेल. तोपर्यंत त्यांचे टँकर भरुन देण्यास आम्ही तयार असल्याचे नगरपालिकेचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यानी सांगितले. 
या दोन्ही यंत्रणेमध्ये समन्वय नसल्याने शासकीय रुग्णालयातील रुग्णांना पाणीटंचाई सहन करावी लागत आहे. 

शासकीय रुग्णालयात पाणी नसल्याने स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले यानी कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ घेऊनच कामाला सूरुवात करावी असे अवाहन केले होते. अगोदर पाणी टंचाई दूर करा मग आम्ही शपथ घेऊ असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे दिसून येत आहे.  

Web Title: water scarcity in usmanabad government hospital