तीन टक्के पाणीसाठ्यावर जिल्ह्याची मदार

नवनाथ येवले
मंगळवार, 23 मे 2017

मोठ्या प्रकल्पांच्या साठ्यात घट; २३ लघू प्रकल्प जोत्याखाली
नांदेड - उष्णतेचा पारा वाढल्याने बाष्पीभवनामुळे प्रकल्पसाठ्यात गतीने घट होत आहे. दोन मोठ्या प्रकल्पात अवघे पंधरा टक्क्यावर पाणी अाहे, तर नऊ मध्यम प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात गतीने घट होत आहे. एकूण ८० लघुप्रकल्पांपैकी २३ लघू प्रकल्पांची पाणीपातळी जोत्याखाली आल्याने एकूण तीन टक्के पाणीसाठ्यावरच आता जिल्ह्याची मदार अाहे.

पावसाळ्यात प्रकल्प, तलाव ओव्हरफ्लो होवूनही बेसुमार पाणीउपसा व उन्हाचा पारा वाढल्याने यंदा फेब्रुवारीतच टंचाईचा सामना करावा लागला. विष्णुपुरी प्रकल्पाचा साठा गतीने घटल्यामुळे इसापूरचे १५ दलघमी तर पंधरवाड्यापूर्वी लोअर दुधनाचे २० दलघमी पाणी नांदेडकरांची तहान भागवण्यासाठी गोदापात्रद्वारे आणावे लागले. दुधनाच्या पाण्यामुळे विष्णुपुरी प्रकल्प १७ टक्क्यांवर आला, तर मानार प्रकल्पाची पाणीपातळी घटल्याने दोन्ही प्रकल्पात अवघा १९.९२ टक्के पाणीसाठा उरला आहे. नऊ मध्यम प्रकल्पांपैकी एक जोत्याखाली असल्याने आठ प्रकल्पात केवळ २७.७८ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्याच्या एकूण टक्केवारीच्या तुलनेत प्रकल्प, तलाव, बंधाऱ्यात अवघा तीन टक्के उपलब्ध पाणीसाठा उरला आहे. शेजारील जिल्ह्याच्या तीन प्रकल्पात अवघा १५.९८१ पाणीसाठा उरल्याने टंचाईउपाय योजनांतर्गत त्या प्रकल्पातून पाणी आणण्याची आशा धुसर झाली आहे. दुधनाच्या पाण्यामुळे नांदेडकरांचा किमान दोन महिने पाणी प्रश्‍न मिटल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी पावसावर विसंबून न राहता उष्णतेचा चढता पारा त्यामुळे होणारे बाष्पीभवन, प्रकल्पातून होणाऱ्या पाणीउपशावर वेळीच प्रतिबंधात्मक उपाय राबवले नाहीत तर जूनमध्ये नांदेडकरांवर टंचाईचे संकट ओढावणार आहे. ग्रामीण भागात प्रशासनाकडून ४० टॅंकर तर ९६ अधिगृहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सिंचन विहीरींनी तळ गाठल्याने अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी बंद पडल्याने नागरिकांना पायपीट करावी लागत आहे.

प्रकल्प-संख्या- पाणीसाठा
मोठे - २ - १९.९२ टक्के
मध्यम - ९ - २७.७८ टक्के
लघू - ८० - २१.०५ टक्के
एकूण नांदेड जिल्हा ३ टक्के

जोत्याखाली प्रकल्प
मध्यम प्रकल्प - एक
लघू प्रकल्प - २३

Web Title: water shorate in nanded district