साठ गावांना पाणीटंचाईचा फटका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

टॅंकरचे प्रस्ताव प्रवासातच
दरम्यान, टंचाईचे उग्र रूप धारण केलेल्या तब्बल दहा गावांचे टॅंकरचे प्रस्ताव पंचायत समितीच्या संबंधित विभागाकडून उपविभागीय अधिकारी कार्यालयाला मंजुरीसाठी पाठविण्यात आले. मात्र या प्रस्तावांत त्रुटी असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रस्तावांच्या संचिका मात्र अद्याप सिल्लोड-सोयगाव प्रवासात अडकल्या असून परत संबंधित विभागाला प्राप्त झाल्या नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

सोयगाव - तालुक्‍यात पाणीटंचाईच्या झळा अधिकच तीव्र होत असताना तब्बल ६० गावांना भीषण पाणीटंचाईचा फटका बसला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी पायी भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, तालुक्‍यात पाणीटंचाईचे विदारक दृश्‍य निर्माण झाले असताना तालुका प्रशासनाचे मात्र केवळ आठ गावांचे टॅंकरचे प्रस्ताव अद्यापही मंजुरीसाठी महिनाभरापासून धूळ खात पडून आहेत. त्यामुळे उर्वरित ५२ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्यापही गंभीर आहे.

सोयगाव तालुक्‍यात निवडणुकांपूर्वी तब्बल ६० गावांना तीव्र पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. निवडणुकांच्या कामात व्यस्त असलेल्या तालुका प्रशासनाच्या वतीने यापूर्वी टंचाईग्रस्त गावांचे पाठविलेले टॅंकरचे प्रस्ताव अद्यापही मंजुरीसाठी धूळ खात पडून आहेत. त्यामुळे सोयगाव तालुक्‍यातील या आठ गावांच्या प्रस्तावांवर अद्यापही शिक्कामोर्तब झाले नाही. त्यामुळे ५२ गावांचा टंचाईचा प्रश्न अद्याप कायम राहिला आहे. 

दरम्यान, ग्रामसेवकांनी तातडीच्या गावांच्या पाठविलेल्या टॅंकरच्या प्रस्तावावर संबंधित गावांची पाहणी करण्यासाठी क्षेत्रीय अधिकारीच उपलब्ध नसल्याने काही गावांचे प्रस्ताव अद्यापही पंचायत समितीच्या कार्यालयातच पडून आहेत. हातपंप कोरडेठाक झाले असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना शेतीशिवार व जंगल भागात भटकंती करावी लागत असल्याने भरउन्हात महिलांना जंगलात जाऊन पिण्याचे पाणी शेंदावे लागत आहे.

प्रभारी गटविकास अधिकारी 
सोयगाव पंचायत समितीला प्रभारी गटविकास अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांना यंत्रणा राबविताना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सोयगावच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिरंगाई होत असल्याने पाणीटंचाईचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

नियंत्रण सुटले
दरम्यान, कर्मचाऱ्यांची दांडी आणि ग्रामसेवकांची दिरंगाई यामुळे काही गावांत पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या दिरंगाई करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, कवली, निमखेडी, उमरविहिरे या गावांची टंचाई गंभीर झाली असताना संबंधित ग्रामसेवकांनी मात्र काणाडोळा केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे.

Web Title: Water Shortage to 60 Village Summer Heat