जनावरे माळावर; छावण्यांचे प्रस्ताव धूळखात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 फेब्रुवारी 2019

बीड - खरिपात पावसाने पाठ फिरविली आणि रब्बीतही परतीचा पाऊस न झाल्याने चाऱ्याचे पीक आलेच नाही. त्यामुळे जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्‍न बिकट झाल्याने पशुपालक हैराण आहेत. मात्र, किचकट शासन निर्णयामुळे छावण्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात धूळखात पडून आहेत. जिल्हाभरातून छावण्या सुरू करण्याचे २०३ प्रस्ताव दाखल झाले आहेत.

जिल्ह्यात यंदा सरासरीच्या निम्माच पाऊस झाला. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ६६६.३६ मिमी असून यंदाच्या हंगामात केवळ ३३५ मिमी (५० टक्के) पाऊस झाला. त्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. यंदा एकही मोठा पाऊस न झाल्याने जलस्रोतही कोरडेठाक आहेत. जिल्ह्यातील एकूण १४४ लघू व मध्यम प्रकल्पांपैकी साधारण ९० प्रकल्प कोरडे आहेत. परतीच्या पावसानेही दगा दिल्याने रब्बीची पेरणीही अत्यल्प झाली.

जिल्ह्यात खरिपात मोठ्या प्रमाणात कापूस आणि उडीद, मूग, सोयाबीन ही पिके घेतली जातात. चाऱ्याच्या पिकांचा पेरा अत्यल्प असतो. रब्बीमध्ये ज्वारीच्या पेऱ्यातून जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था शेतकरी करत असतात. यंदा मात्र शेतकऱ्यांचे सर्वच गणित पावसाने बिघडविले आहे. जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्‍न बिकट झाला आहे. पशुपालक चारा-पाण्यामुळे कवडीमोल भावाने जनावरे बाजारात विकत आहेत. मात्र, सुरवातीला चारा छावण्या सुरू करण्याबाबत संभ्रम निर्माण करणाऱ्या शासनाने अखेर निर्णय घेतला असला तरी तो किचकट घेतला आहे. चारा छावण्यांची मंजुरी पालकमंत्र्यांच्या संमतीनेच असल्याने अद्याप एकही प्रस्ताव निकाली निघालेला नाही. जिल्ह्यातून दाखल झालेले २०३ प्रस्ताव निर्णयाविना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित आहेत. एकीकडे चारा-पाण्यावाचून जनावरांचे हाल आणि पशुपालक हैराण असताना शासनाने किचकट निर्णय घेऊन अडचणीत आणखीच वाढ केली आहे.

बीड तालुक्‍यातून सर्वाधिक प्रस्ताव
चारा छावण्या सुरू करण्याचे सर्वाधिक ११४ प्रस्ताव बीड तालुक्‍यातून आहेत. जिल्ह्यातून एकूण प्रस्तावांच्या निम्म्याहून अधिक प्रस्तावांची संख्या बीडची आहे.

Web Title: Water Shortage Animal Fodder Depo