टॅंकर भरा; पण वाळूजमधून! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

औरंगाबाद - शहरातील पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने एमआयडीसीला साकडे घातले आहे. 25 टॅंकरसाठी पाणी देण्याची तयारी एमआयडीसीने केली असली तरी टॅंकर भरण्याची सोय मात्र वाळूज येथून केली जाईल, अशी अट टाकली आहे. त्यामुळे एवढ्या दुरून शहरात पाणी आणणे शक्‍य आहे का? यावर महापालिका प्रशासनाचा विचार सुरू  आहे. 

शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता महापालिकेला 203 एमएलडी पाण्याची गरज आहे. मात्र महापालिकेच्या पाणीपुरवठा योजना अत्यंत खिळखिळ्या झाल्याने सध्या जेमतेम 135 ते 140 एमएलडी पाण्याचा उपसा नाथसागरातून केला जात आहे. शहरापर्यंत मात्र 125 ते 130 एमएलडी पाणी येते. हे पाणी अपुरे असल्यामुळे सध्या पाच-सहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. नागरिकांची ओरड लक्षात घेता एमआयडीसीकडून किमान पाच एमएलडी पाणी मिळावे, अशी मागणी गतवर्षीपासून महापालिकेतर्फे शासनाकडे केली जात आहे. टॅंकरला रोज तीन ते पाच एमएलडी पाणी लागते. त्यामुळे टॅंकरचा भरणा एमआयडीसीच्या पाण्यावर केल्यास हेच पाणी इतर भागाला देता येईल, असे प्रशासनाने नियोजन केले आहे. एमआयडीसीने रोज 25 टॅंकर भरून देण्याची सुविधा वाळूजमध्ये करून दिली जाईल, असे महापालिकेला कळविले आहे. शहरातील पाणीटंचाईचा भाग व वाळूज हे अंतर 15 ते 20 किलोमीटरचे आहे. त्यामुळे टॅंकरच्या फेऱ्या कमी होतील. म्हणून सिडको एन-एक भागात टॅंकर भरण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, अशी मागणी महापालिकेने केली आहे. त्यावर 15
एप्रिलपर्यंत निर्णय होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 
 
टॅंकरची संख्या वाढविणार 
महापालिकेतर्फे सध्या शंभरपेक्षा अधिक टॅंकरद्वारे सुमारे 650 फेऱ्या करून पाणी दिले जात आहे. वाळूज येथून टॅंकरने पाणी आणायचे झाल्यास टॅंकरची संख्या वाढवावी लागेल. खर्चही वाढणार असून, टॅंकरसाठी महापालिकेला 10 कोटी रुपये मिळावेत, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. 
 
Web Title: Water shortage in Aurangabad