औरंगाबाद शहरात घागर उताणी!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

‘तुमच्या बोअरला पाणी आहे का?’, ‘अहो! ऐकलंत का टाकीत पाणी नाही’, ‘आमचा बोअर पूर्णपणे आटला’, ‘टॅंकरवाल्याला फोन करा?’, ‘हजार रुपये मागतोय एका टॅंकरचे?’, असे संवाद सध्या सातारा-देवळाई परिसरातील घराघरांत ऐकायला मिळत आहेत. हेच चित्र हर्सूल परिसरातील काही भागांत आहे.

औरंगाबाद - ‘तुमच्या बोअरला पाणी आहे का?’, ‘अहो! ऐकलंत का टाकीत पाणी नाही’, ‘आमचा बोअर पूर्णपणे आटला’, ‘टॅंकरवाल्याला फोन करा?’, ‘हजार रुपये मागतोय एका टॅंकरचे?’, असे संवाद सध्या सातारा-देवळाई परिसरातील घराघरांत ऐकायला मिळत आहेत. हेच चित्र हर्सूल परिसरातील काही भागांत आहे.

महापालिकेकडून सातारा परिसरातील बहुतांश भागात पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे या परिसरातील लोकांना स्वतःच्या बोअर, टॅंकरवरच अवलंबून राहावे लागते; परंतु तीव्र उन्हाळ्यामुळे भूजल पातळी खालावली आहे. त्यामुळे या भागातील अनेकांच्या घरातील पाण्याचे बोअर आटले आहेत. तर पाण्याचे टॅंकरचे भाव गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. औरंगाबाद शहर व सातारा-देवळाई परिसर हा खाऱ्या पाण्याचा पट्टा आहे. त्यामुळे ज्या बोअरला पाणी लागते ते साधारणतः क्षारयुक्त पाणी असते. पिण्यासाठी अयोग्य असल्याने त्या पाण्याचा घरगुती वापरासाठी वापर होतो; परंतु सध्या बोअरच आटल्यामुळे सांडपाण्यासाठी लागणारे पाणीही विकत घेण्याची वेळ परिसरातील नागरिकांवर आली आहे. 

जायकवाडी धरणात आजघडीला उपयुक्त पाणीसाठा संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शहरालाही सात ते आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा सुरू आहे. त्यातच भूगर्भातील पाण्यावरच नागरिकांना दिवस काढावे लागत आहे.

गतवर्षीच्या अत्यल्प पावसामुळे भूगर्भातील पाणी पातळी दोन ते तीन मीटरने खाली गेली आहे. सध्या दोनशे फुटांपेक्षा अधिक खोल असलेल्या बोअरला एक दोन हंडे पाणी येते; तर त्यापेक्षा कमी खोलीच्या बोअर केव्हाच कोरडे पडले आहेत. त्यामुळे सातारा-देवळाई परिसरातील अनेकांनी मुलाबाळांसह पावसाळा सुरू होईपर्यंत स्थलांतराचा निर्णय घेतला आहे.

महापालिका पाण्याचा पुरवठा करीत नाही. दीड महिन्यांपासून घरातील पाण्याचा बोअर आटल्यामुळे विकतच पाणी घ्यावे लागते. आतातर टॅंकरवालेही मनमर्जीचे भाव लावून पाणी विकत देतात. पावसाळा सुरू होईपर्यंत गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. 
- माणिक दराडे, नागरिक, सातारा देवळाई परिसर 

गेल्या आठ ते दहा वर्षांपासून या भागात महापालिकेकडून पाणीच मिळत नाही. पाण्यासाठी दर महिन्याला वेगळे पैसे काढून ठेवावे लागतात; परंतु यंदा टॅंकरचे भाव वाढल्याने घरखर्चाचे बजेट बिघडले आहे.  महापालिकेचे टॅंकर येतात; परंतु कोणाला पाणी मिळते, कोणाला नाही. 
- शारदा नागरे, गृहिणी, सातारा परिसर

Web Title: Water Shortage in Aurangabad City