आठवड्यातून एकदा मिळते चार घागरी पाणी

खेड (ता. उस्मानाबाद) - बलभीम गरड यांच्या शेतातील कूपनलिकेवर पाणी भरण्यासाठी झालेली गर्दी.
खेड (ता. उस्मानाबाद) - बलभीम गरड यांच्या शेतातील कूपनलिकेवर पाणी भरण्यासाठी झालेली गर्दी.

कसबेतडवळे - खेड (ता. उस्मानाबाद) येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. साडेपाच हजार लोकसंख्येच्या गावाला चार अधिग्रहण केलेल्या कूपनलिकांद्वारे दिवसाला केवळ ४० हजार लिटर पाणी मिळत आहे. तर गावामध्ये आठवड्यातून एक वेळा नळयोजनेद्वारे चार घागरी पाणी मिळत असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

खेड येथे कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यासाठी गावालगतच्या साठवण तलावात एक विहीर व एक कूपनलिका होती. या विहीर व कूपनलिकेचे पाणी गावातील मोठ्या टाकीमध्ये सोडून नळयोजनेद्वारे गावात पाणीपुरवठा केला जात होता; मात्र गेल्या दोन वर्षांपासून पाऊस न झाल्याने साठवण तलाव कोरडा पडला. त्यामुळे कूपनलिका व विहीरही कोरडी पडल्याने गावाचा पाणीपुरवठा बंद झाला. शासनाच्या वतीने ग्रामपंचायतीला चार अधिग्रहणाची परवानगी मिळाली आहे. ग्रामपंचायतीने चार ठिकाणी कूपनलिका अधिग्रहण करून त्याचे पाणी गावातील मोठ्या टाकीत सोडून नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे; मात्र वाढत्या उन्हामुळे पाणीपातळी खालावली आहे.

गावातील ८० हजार लिटर पाणी क्षमता असलेली टाकी भरण्यासाठी दोन दिवस लागतात. म्हणजेच दिवसाकाठी केवळ ४० हजार लिटर पाणी टाकीत जमा होते. टाकी पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर गावात पाणीपुरवठा केला जातो. गावात नळजोडणीधारकांची संख्या साडेआठशे असून, सध्या आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा केला जातो; मात्र चार किंवा पाच घागरीच पाणी मिळत असल्याने भटकंती कायम आहे. लोकसंख्येनुसार गावाला दररोज एक लाख १० हजार लिटर पाणी मिळणे अनिवार्य आहे; मात्र गावात सध्या अधिग्रहणाद्वारे केवळ ४० हजार लिटर पाणी मिळते. त्यामुळे पाणीप्रश्‍न पेटल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी रानोमाळ भटकंती सुरू आहे.

ग्रामसेवा युवा संघाचा पुढाकार
गावामध्ये पाण्याचे अपुरे स्रोत असल्याने तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. पाणीटंचाईच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी गावातील ग्रामसेवा युवा संघाचे तरुण पुढे सरसावले आहेत. या तरुणांनी बाहेरचे मोठे व्यावसायिक, बॅंकांशी संपर्क साधून गावाला पाणीटंचाई निवारणासाठी काही तरी मदत करावी, असे आवाहन केले. त्यानुसार गावाला रोटरी क्‍लब (उस्मानाबाद), यशदा मल्टिस्टेट बॅंक (येडशी), इक्विटास बॅंक (उस्मानाबाद), भाई उद्धवराव पाटील शिक्षक व शिक्षकेतर पतसंस्था (उस्मानाबाद) आदींनी दोन हजार लिटर पाणीसाठवण क्षमता असलेल्या प्रत्येकी एक याप्रमाणे चार टाक्‍या दिल्या आहेत. टाक्‍या गावामध्ये चार मध्यवर्ती ठिकाणी बसविण्यात आल्या असून, त्यात पाणी सोडण्यासाठी गावातील शेतकरी सरसावले आहेत.

बलभीम गरड व कुमार लोमटे हे दोघे आपल्या शेतातील कूपनलिकेचे पाणी दररोज टाकीत सोडून गावाची तहान भागविण्याचा प्रयत्न करीत आहेत. श्री. गरड हे गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या शेतातील कूपनलिकेचे पाणी ग्रामस्थांना मोफत देत आहेत. पाणी भरण्यासाठी दररोज रात्री त्यांच्या कूपनलिकेवर मोठी रांग दिसून येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com