तहानलेल्या ग्रामस्थांना शेतकऱ्याचे दान!

आष्टाकासार - राजेंद्र शिंदे यांच्या शेतातील कूपनलिकेजवळ बसवलेल्या टाकीतून पाणी भरताना ग्रामस्थ.
आष्टाकासार - राजेंद्र शिंदे यांच्या शेतातील कूपनलिकेजवळ बसवलेल्या टाकीतून पाणी भरताना ग्रामस्थ.

जेवळी - आष्टाकासार (ता. लोहारा) येथील शेतकरी राजेंद्र दिगंबर शिंदे हे सामाजिक बांधिलकीतून गेल्या पाच वर्षांपासून ग्रामस्थांना मोफत पाणीपुरवठा करीत आहेत. ग्रामपंचायतीकडून सध्या आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत असताना शिंदे यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे गावातील संभाजीनगर वस्ती परिसरातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळत आहे.

राजेंद्र शिंदे यांची बसस्थानक परिसरात साडेचार एकर शेती आहे. त्यांनी काही वर्षांपूर्वी कूपनलिका खोदली. चांगले पाणी लागले. आष्टाकासार गावातील संभाजीनगर वस्ती परिसरातील ग्रामस्थांना देऊन उर्वरित पाण्यातून त्यांनी ऊस, भाजीपाला आदी पिके घेतली आहेत. गावात पाच वर्षांपूर्वी तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी स्टेट बॅंक शाखेतर्फे टाकी बसवून देण्यात आली. तेव्हापासून शिंदे ग्रामस्थांना मोफत पाणीपुरवठा करीत आहेत. यंदाही गावात तीव्र पाणीटंचाई आहे. ग्रामपंचायतीतर्फे नळाद्वारे आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा केला जात आहे. हंगरगा साठवण तलावातून होणारा हा पुरवठाही शुद्धीकरण न करता होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतातील एक एकर ऊस मोडून शिंदे ग्रामस्थांना पाणी देत आहेत. 

अधिग्रहणाचे पैसेही दान
प्रशासनाने चार वर्षांपूर्वी शिंदे यांची कूपनलिका काही महिन्यांसाठी अधिग्रहित केली होती. त्यापोटी मिळालेले २१ हजार रुपये त्यांनी गावातील दत्तमंदिरास देणगी दिली आहे.

साडेचार एकर माळरानाची शेती असून, यावरच कुटुंबाची उपजीविका चालते. शेतात खोदलेल्या कूपनलिकेला चांगले पाणीही लागले. हे परमेश्‍वराचे उपकार समजून ग्रामस्थांना मोफत पाणीपुरवठा करून ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत आहे.
- राजेंद्र शिंदे, शेतकरी.

गावात सध्या पाणीटंचाई तीव्र झाली असून, पंचायत समितीकडे दोन महिन्यांपूर्वी चार कूपनलिका अधिग्रहणाचा प्रस्ताव पाठविला आहे. त्याची दखल घेतली जात नाही. अशा स्थितीत राजेंद्र शिंदे हे आपल्या शेतातील पीक मोडून मोफत पाणीपुरवठा करीत आहेत. त्यामुळे भटकंती करणाऱ्या ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळत आहे.
- सुनील सुलतानपुरे, सरपंच, आष्टाकासार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com