नागरिकांचा पाण्यासाठी सिडकोत दोन तास ठिय्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

औरंगाबाद - सिडको एन-तीन, एन-चार भागात पाणीप्रश्‍न गंभीर बनला असून, पाणी मिळाल्याशिवाय गणेश विसर्जन केले जाणार नाही, असा इशारा देत नागरिकांनी वॉर्डातील सार्वजनिक गणपतीचे विसर्जन न करण्याचा निर्णय घेत रविवारी (ता. २३) गणेश मंदिरात दोन तास ठिय्या दिला. आठ दिवसांत पाणीप्रश्न सोडविण्याचे महापालिकेतर्फे आश्‍वासन दिल्यानंतर नागरिकांनी गणरायाला निरोप दिला.

औरंगाबाद - सिडको एन-तीन, एन-चार भागात पाणीप्रश्‍न गंभीर बनला असून, पाणी मिळाल्याशिवाय गणेश विसर्जन केले जाणार नाही, असा इशारा देत नागरिकांनी वॉर्डातील सार्वजनिक गणपतीचे विसर्जन न करण्याचा निर्णय घेत रविवारी (ता. २३) गणेश मंदिरात दोन तास ठिय्या दिला. आठ दिवसांत पाणीप्रश्न सोडविण्याचे महापालिकेतर्फे आश्‍वासन दिल्यानंतर नागरिकांनी गणरायाला निरोप दिला.

सिडको एन-तीन, एन-चार भागात गेल्या काही दिवसांपासून पाणीप्रश्‍न गंभीर बनला आहे. त्यामुळे नागरिकांनी यापूर्वी आंदोलन केले होते. त्या वेळी आश्‍वासन देण्यात आल्याने नागरिकांनी माघार घेतली. दरम्यान, या भागात तीन दिवसांनंतर रविवारी पाणीपुरवठा होणार होता; मात्र नळांना पाणी आले नाही. चौकशी केली असता ऐनवेळी पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संतप्त नागरिकांनी वॉर्डातील सार्वजनिक गणपतीचे विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला. आयुक्त येत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाही, असा इशारा देत नागरिकांनी गणेश मंदिरात ठिय्या दिला. माहिती मिळताच पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे आणि उपअभियंता के. एम. फालक यांनी नागरिकांची भेट घेऊन गणेश विसर्जन करण्याची विनंती केली; मात्र नागरिक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. यानंतर अतिरिक्त आयुक्त डी. पी. कुलकर्णी यांनीही समजूत काढण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी ‘तुम्हाला अधिकार नाहीत, आयुक्तांनाच बोलवा’, अशी मागणी केली. आयुक्त आजारी असल्याने येऊ शकले नाहीत, असे सांगत कुलकर्णी यांनी मोबाईलवरून नगरसेवक व काही नागरिकांचे आयुक्तांशी बोलणे करून दिले. दोन दिवसांत अधिकाऱ्यांची बैठक घेऊ, त्यानंतर स्वतः पाहणी करून आठ दिवसांत हा प्रश्न सोडवू, असे आश्‍वासन देत आयुक्तांनी गणपती विसर्जन करावे, अशी विनंती केली. आठ दिवसांत पाणीप्रश्न सुटला नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देत नागरिकांनी विसर्जन केले. या वेळी नगरसेविका माधुरी अदवंत, प्रमोद राठोड यांच्यासह वॉर्डातील नागरिकांचा मोठा जमाव जमला होता.

पुंडलिकनगर टाकीवरून वाद 
यावेळी राहुल इंगळे व प्रमोद राठोड यांच्यात खडाजंगी झाली. सत्ताधाऱ्यांनी काम केले नसल्यामुळे पाणी 
मिळत नसल्याचे इंगळे 
यांनी नमूद करताच वाद लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

Web Title: water shortage Ganpati Visarjan