बिडकीनला या, मुबलक पाणी घ्या!

Bidkin-Water
Bidkin-Water

औरंगाबाद - ‘डीएमआयसी’अंतर्गत बिडकीन येथे उभारण्यात येत असलेल्या महाकाय औद्योगिक शहरात पायाभूत सुविधांची कामे वेळेच्याही पुढे आहेत. येथे येण्यासाठी उत्सुक असलेल्या उद्योगांनी निर्धास्तपणे यावे, त्यांना जायकवाडीतून येणाऱ्या एमआयडीसीच्या जलवाहिनीतून पाण्याचा अविरत पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती ‘एआयटीएल’तर्फे देण्यात आली. 

डीएमआयसीच्या शेंद्रा नोडमध्ये गुंतवणूकदारांनी रस दाखविल्यावर बिडकीन या अधिक मोठ्या औद्योगिक शहरातील जागांसाठी बड्या उद्योगांची चाचपणी सुरू झाली आहे. जपानी आणि कन्स्ट्रक्‍शन क्षेत्रातील उद्योग असलेल्या ‘फ्युजी सिल्व्हरटेक’ या कंपनीने बिडकीनमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी सध्या या नोडसाठी स्वतंत्र वाहिनी नाही. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या ‘भारतमाला’ प्रकल्पांतर्गत शेंद्रा-बिडकीन-शेवगाव रस्त्याचे रेखांकन पूर्ण होत नाही तोपर्यंत बिडकीनला नव्या पाण्याची वाहिनी जायकवाडीतून घेणे अवघड आहे. पण या वाहिनीची वाट न पाहता शेंद्रा आणि जालना औद्योगिक वसाहतीसाठी तयार करण्यात आलेल्या ७२ एमएलडीच्या जलवाहिनीतून बिडकीनसाठी ब्रॅंच लाइन वळविण्यावर सध्या खल सुरू आहे. ७२ एमएलडी वाहिनीतून येणाऱ्या पाण्यात शेंद्रा डीएमआयसी नोडचे २० एमएलडी पाणी आरक्षित आहे. शेंद्रा नोडची गरज लक्षात घेता ही तजवीज सध्या गरजेपेक्षा अधिक आहे. त्यातील शिल्लक पाणी हे बिडकीनसाठी वापरता येण्याबाबत एमआयडीसी आणि डीएमआयसीच्या अधिकाऱ्यांमध्ये औरंगाबादेत मंगळवारी (ता. ११) चर्चा झाली.

खोडेगाव प्लॅंटपासून वळवणार जलवाहिनी
जायकवाडीपासून शेंद्रामार्गे जालना औद्योगिक वसाहतीच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ७२ एमएलडीच्या ५० किलोमीटर जलवाहिनीचा सर्वोच्च बिंदू हा खोडेगाव येथे आहे. त्याच ठिकाणी एमआयडीसीने जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला असून, येथपर्यंत पाणी पंपाने आणले जाणार आहे. खोडेगाव परिसरापर्यंत डीएमआयसीची जागा असून ही पाण्याची स्वतंत्र ब्रॅंच लाइन अंथरणे सोपे होणार आहे. स्वतंत्र वाहिनी पूर्ण क्षमतेने सुरू होईपर्यंत वापरण्यात येऊ शकणारी वाहिनी किती क्षमतेची आहे, यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

बिडकीनमध्ये येणाऱ्या उद्योगांना पाणी कमी पडणार नाही. खोडेगाव येथून अवघ्या पाच किलोमीटरवर जलवाहिनी टाकल्यास बिडकीनपर्यंत पाणी येणे शक्‍य आहे. या गावात एमआयडीसीचा जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. 
- गजानन पाटील, सहसरव्यवस्थापक, एआयटीएल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com