हिंगोलीत हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत

मंगेश शेवाळकर
सोमवार, 8 एप्रिल 2019

मराठवाड्यात पाणीटंचाईचा प्रश्‍न उग्र बनत असून ग्रामीण भागाची होरपळ सुरू आहे. अनेक गावांना पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. हिंगोलीच्या औंढा तालुक्‍यातील लक्ष्मण नाईक तांडा या गावातही अशीच स्थिती आहे.

हिंगोली - मराठवाड्यात पाणीटंचाईचा प्रश्‍न उग्र बनत असून ग्रामीण भागाची होरपळ सुरू आहे. अनेक गावांना पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. हिंगोलीच्या औंढा तालुक्‍यातील लक्ष्मण नाईक तांडा या गावातही अशीच स्थिती आहे. दोन पाणीपुरवठा योजना असूनही गावकऱ्यांच्या घशाला कोरड पडली आहे. दीड किलोमीटरवरून पाणी आणावे लागत आहे. गावात पाणी नसल्याने पन्नास टक्के शेतकऱ्यांनी जनावरे विकली आहेत. 

लक्ष्मण नाईक तांडा हे सुमारे बाराशे लोकवस्तीचे गाव असून बहुतांश गावकरी शेती, रोज मजुरी करतात. दुग्धोत्पादनही होते. गावात आमदार विकास निधी आणि जलस्वराज योजनेत दोन पाणी योजना आहेत. जलस्रोत आटल्याने डिसेंबरपासून दोन्ही योजना बंद पडल्या आहेत. तेव्हापासून गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. ही स्थिती गेल्या अनेक वर्षांपासून असून कायमस्वरूपी हा प्रश्‍न सोडविण्यात पाणीपुरवठा विभागाला शक्‍य झाले नाही. 

सध्या गावात पाण्यासाठी कसरत सुरू आहे. परिसरातील जंगलातील विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. आपल्याला पाणी मिळावे, लवकर भरता यावे, यासाठी चक्क विहिरीत उतरून हंडे भरून घेण्यासाठी जीवघेणी कसरत सुरू आहे. 

गावात दुग्धोत्पादनासाठी शेतकऱ्यांकडे गायी, म्हशी आहेत. शेतीकामासाठी बैलजोड्या आहेत. मागील दोन वर्षांतील दुष्काळी परिस्थितीमुळे ज्वारीचे पीक आले नाही. त्यामुळे कडबा मिळाला नाही. तर तूर, हरभरा, सोयाबीन पाण्याअभावी हाती आलेच नाही. या पिकांचे कुटारही बैलांना खाण्यासाठी नाही. सध्या शेतकरी तीस ते चाळीस रुपये दराने पेंढी कडबा आणून जनावरांना खाऊ घालत आहेत. एकीकडे पैसे देऊन चारा उपलब्ध होत असला, तरी दुसरीकडे पिण्यासाठी पाणी नाही. त्यामुळे पन्नास टक्के शेतकऱ्यांनी जनावरे विकली आहेत. सध्या गावकरी भीषण दुष्काळातून वाटचाल करीत असून कधी एकदा पाऊस पडतो, असे त्यांना झाले आहे.

पोटासाठी धान्य खरेदी करावे की जनावरासांठी चारा, पाण्याला पैसे खर्च करावेत असा प्रश्न आहे. शेतीमधून उत्पादन आणि चाराही न मिळाल्याने जनावरांचे हाल पाहवत नाहीत. त्यामुळे अनेकांनी जनावरे विकली आहते, काही विक्रीच्या तयारीत आहेत.
- रवींद्र पवार, गावकरी

गावात दोन योजना असल्या, तरी जलस्रोत आटत असल्याने त्या उन्हाळ्यापूर्वीच निकामी होतात. परिणामी टंचाई निर्माण होते. आता गावात टॅंकरने पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव आहे. लोकसंख्येच्या तुलनेत टॅंकरच्या खेपा करून पाणीपुरवठा केला जाईल.
किशोर लिपणे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग

Web Title: Water shortage in Marathwada