पाणीटंचाईमुळे विवाह समारंभ गावाबाहेर

चोबळी, ता. अहमदपूर - शिवारातील पाण्याअभावी करपलेले काकडीचे पीक.
चोबळी, ता. अहमदपूर - शिवारातील पाण्याअभावी करपलेले काकडीचे पीक.

औरंगाबाद - पाण्यामुळे मुलामुलींचे लग्न गावाबाहेर करावे लागत असल्याचे दुःख अहमदपूर तालुक्‍यातील दुष्काळग्रस्त चोबळी येथील गावकरी सांगत होते. शिऊर ताजबंद, उदगीर, अहमदपूर अशा पाणी असलेल्या ठिकाणी लग्न लावले जात असल्याचे सय्यद बाशू आझमसाहब यांनी सांगितले; तसेच पाण्यासाठी अधिकचे पैसे घेतले जातात. मंगल कार्यालयांचे दरही पाण्यामुळे अधिक आहेत.

चाळीस दिवसांनी नळाला पाणी येते; पण तेही एका गल्लीला. चोबळीत जलस्रोत नाहीत. येथे चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. लांबून कडबा विकत आणावा लागत असल्याचे शेतकरी सांगत होते. गावात दोन हातपंप आहेत; पण त्यालाही पाणी नाही. ग्रामसभेला दोन-तीनजण बसणार, आम्हाला त्यातील काही सांगितले जाणार नाही, असं गाऱ्हाणं गावकरी आमच्याकडे करीत होते. गावच्या विकासप्रक्रियेत ग्रामसभेला महत्त्वाचं स्थान आहे; मात्र येथे गावकरीच प्रक्रियेबाहेर असल्याचे दिसत होते. पाणी जर येणार असेल तर बरेचजण बाहेरगावी जाण्याचे टाळतात. सोयाबीनचं पीक थप्पीला लावलं तेव्हापासून शेतात पीकच नसल्याचे अनंत पाटील हे ग्रामस्थ सांगत होते.

परिसरात बहुतांश विंधनविहिरी आहेत; मात्र त्या दहा मिनिटेच चालतात. येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीत दहा टॅंकर टाकून फक्त जनावरांसाठीच पाणी राखून ठेवण्यात आले आहे. गावचा समावेश जलयुक्त शिवार योजनेत असल्याने टॅंकर मिळाले नसल्याचे गावकरी सागंतात. मागील चार वर्षांपासून येथे दुष्काळी परिस्थिती आहे. 

वायगावला हातपंपाचे पाणी
चोबळीहून वायगावला आम्ही निघालो. शेतशिवार उजाड पडल्याचे दिसत होते. अनेक ठिकाणी पाण्यासाठी नवीन विहिरींचे खोदकाम, विंधनविहिरी घेण्याचे काम जोरात सुरू होते. पाणी लागेल की नाही हा नंतरचा प्रश्‍न; पण विहीर खोदायला हवी असं चित्र पाहावयास मिळत होत. वायगावला पिण्यासाठी फक्त हातपंपाचे पाणी वापरले जाते. पाणी कमी आल्याने उसावर नांगर फिरवावं लागलं, असं दीपक कांबळे सांगत होते. काही लोकांना दूरवर चालणं शक्‍य नाही. अशी लोकं हापशाजवळ तासन्‌तास बसून पाणी भरतात. येथील ग्रामपंचायतीने एकच विंधनविहीर अधिग्रहित केली. पाण्याअभावी शेळीची पिले मेली असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

चार वर्षांपासून दुष्काळी स्थिती आहे; मात्र यंदाचा दुष्काळ मोठा हाय. पाऊस पडला तर ठीक, नाहीतर गाव सोडावं लागेल.
- अनंत पाटील

उंबरगा, माकणी, शिऊर ताजबंद या ठिकाणांहून पाणी आणलं जातं. सध्या या शिवारातील पाणी संपले आहे.
- बालाजी पाटील 

गावात ऊसतोड मजुरांची संख्या अधिक आहे. सध्या साखर कारखाने बंद झाले आहेत. ती परत गावी येऊन वीटभट्टीच्या कामाला गेली आहेत. काहीजण पुणे-मुंबईला बांधकाम मजूर म्हणून काम करतात.
- दीपक कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com