नऊ दिवसांनंतरही पाण्याचा ठणठणाट

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 5 जुलै 2019

हडकोत टॅंकरचे पाणी 
पवननगर वॉर्डात गुरुवारी आठव्या दिवशी देखील पाणी आले नाही. त्यामुळे नगरसेवक नितीन चित्ते यांनी महापालिकेकडून रिकामे टॅंकर घेऊन त्यात एका विहिरीचे पाणी भरून घेतले व हे पाणी नागरिकांना देण्यात आले.

औरंगाबाद - सिडको-हडकोसह चिकलठाणा, मुकुंदवाडी भागात पाण्याचा ठणठणाट कायम आहे. काही भागात पाणी येऊन गुरुवारी (ता. चार) आठ दिवस उलटले तर काही भागात पाच ते सात दिवस झाले आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावा लागत आहे.

शहराचा पाणीपुरवठा सध्या सलाईनवर आहे. जायकवाडी धरणातील पाणीपातळी दिवसेंदिवस खोलवर जात असल्यामुळे महापालिकेच्या पंपाचा पाणी उपसा घटत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागातील अधिकारीही त्रस्त आहेत. पाणीटंचाईचा सर्वाधिक त्रास मात्र सिडको-हडको, चिकलठाणा, मुकुंदवाडी भागाला बसत आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात महावितरण व महापालिकेने १४ तासांचे शटडाऊन घेत दुरुस्तीचे विविध कामे करून घेतली. त्यामुळे एक दिवसाने पाणीपुरवठा पुढे ढकलला असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र अद्याप पाणीपुरवठा पूर्वपदावर आलेला नाही. शटडाऊनचा फटकाही सिडको-हडकोलाच बसला आहे. सिडको- हडकोत गुरुवारी आठव्या दिवशी अनेक भागाला पाणी आले नाही. चिकलठाणा, मुकुंदवाडी, एन-तीन भागाला मात्र दहाव्या दिवशीही पाणी पुरवठा झालेला नाही. या भागात पाणी न आल्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. 

सध्या खासगी टॅकरही मिळत नसल्याने पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. एन-पाच आणि एन-सातच्या टाकीवरून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यासाठी उपअभियंता आर. एन. संधा आणि अशोक पद्मे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र पाणीच कमी असल्यामुळे अधिकाऱ्यांना देखील तारेवरची कसरत करावी लागत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Shortage Water Supply