आता सकाळी सहापासून टॅंकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मे 2019

एन-१चे पाणी पिण्यायोग्यच
एमआयडीसीच्या एन-१ टाकीवरील पाणी घेण्यास लोक विरोध करत आहेत. हे पाणी गढूळ असल्याच्या कारणावरून हा विरोध होत आहे, मात्र या टाकीवरून अन्य लोकही पाणी घेत असतात, त्यांच्या काहीही तक्रारी नाहीत. तसेच, महापालिका प्रशासनाने या टाकीच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासले असून हे पाणी पिण्यायोग्य आहे. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत लोकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. लोकांमधील गैरसमज दूर व्हावा यासाठी प्रयोगशाळेतील तपासणी अहवाल वृत्तपत्रांतून जाहीर प्रगटनाद्वारे जनतेसमोर ठेवला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरासाठीचा पाणीपुरवठा दहा एमएलडीने घटल्याने उपाययोजना
औरंगाबाद - जायकवाडी धरणातून शहरात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात १० एमएलडीने घट झाली आहे. शहरात पाणीबाणी निर्माण झाली आहे. रमजानच्या महिन्यात जनतेची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या; तसेच एन-१ येथील एमआयडीसीच्या पाण्याच्या टाकीवरून सकाळी आठऐवजी सहापासून टॅंकरचा भरणा करून पाणीपुरवठा सुरू करा, असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी पाणीपुरवठा विभाग व टॅंकर कंत्राटदाराला दिले आहेत. 

पाणीपुरवठयाविषयी सोमवारी महापौरांनी आढावा घेतला. महापालिका क्षेत्रातील ज्या भागात नळयोजना पोचली नाही तिथे टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो, या बदल्यात नागरिकांकडून आधी पैसे घेतले जातात.

पाणीटंचाईपूर्वी अशा भागात दिवसाआड टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता; मात्र आता दोन दिवसांचे वेळापत्रक बनविले आहे. तर काही भागांत एक दिवसाआडच सुरू आहे; मात्र पैसे भरूनही टॅंकरचे पाणी मिळत नसल्याची लोकांमधून ओरड होत आहे. आढावा बैठकीत अधिकाऱ्यांनी मात्र हा आरोप खोडून काढत जे पैसे भरत नाहीत ते ओरड करीत असल्याचे सांगितले. चिश्‍तिया चौकातील सिडको एन- ५ येथील टाकीवर टॅंकर कुठे जातो याच्या अपुऱ्या नोंदी असल्याच्या तक्रारींवर यापुढे जीपीएस यंत्रणेद्वारे टॅंकरवर नियंत्रण ठेवावे. एका अधिकाऱ्याकडे ही जबाबदारी द्यावी; तसेच टॅंकरच्या नोंदी घेताना संपूर्ण नाव, कोणत्या भागात जात आहे तेथील संपूर्ण पत्ता नोंद करण्याचे सांगितले.

खेपा वाढणार
जायकवाडी धरणातून पूर्वी १३५ एमएलडी पाण्याचा उपसा केला जायचा, त्यात घट होउन तो १२५ पर्यंत आला, तर सध्या ११५ एमएलडी इतका झाला आहे. एमआयडीसीच्या एन-१ व एन-७ येथील टाकीवरून सकाळी आठ वाजता टॅंकर भरण्यास सुरवात केली जात होती, यात तातडीने बदल करून सकाळी सहा वाजेपासून टॅंकर भरायला सुरवात करा, त्यामुळे टॅंकरच्या खेपा वाढतील. रमजानचा महिना आहे, पाण्याअभावी जनतेची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. तसेच, एसटी महामंडळाला बसगाड्या धुण्यासाठी एसटीपीचे पाणी देण्याचे निर्देश महापौरांनी दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Shortage Water Tanker Drought