दोन इंची नळ असूनही खाजगी टँकरने घ्यावे लागते पाणी 

मधुकर कांबळे
बुधवार, 9 मे 2018

एकीकडे पिण्याच्या पाण्याची अडचण तर वापराच्या पाण्याची त्याहून वाईट अवस्था आहे. खुद्द सभापतींच्या दालनांमधील स्वच्छतागृहात पाणी नाही मग या कार्यालयातील इतर स्वच्छतागृहांमधील पाण्याच्या व्यवस्थेबद्दल न बोललेच बरे इतकी वाईट अवस्था आहे.

औरंगाबाद : जिल्हा परिषदेत पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी दोन इंची नळाचे कनेक्‍शन घेण्यात आले आहे. दररोज 10 ते 12 हजार लिटर पाण्याची गरज आहे, मात्र नळाला चार दिवसात फक्‍त पाच हजार लिटर पाणी मिळते. पाण्याची गरज भागविण्यासाठी जिल्हा परिषदेला पूर्णत: टँकरवरच अवलंबून रहावे लागते. महिन्याला टँकरच्या बिलापोटी 30 हजार म्हणजे वर्षाला 3 लाख 66 हजार रुपये नुसत्या टँकरच्या बिलावरच खर्च करावे लागतात. एवढे करुनही कर्मचाऱ्यांना पाणी मात्र घरुनच बाटल्या भरुन आणाव्या लागतात ही शोकांतिका आहे. 

एकीकडे पिण्याच्या पाण्याची अडचण तर वापराच्या पाण्याची त्याहून वाईट अवस्था आहे. खुद्द सभापतींच्या दालनांमधील स्वच्छतागृहात पाणी नाही मग या कार्यालयातील इतर स्वच्छतागृहांमधील पाण्याच्या व्यवस्थेबद्दल न बोललेच बरे इतकी वाईट अवस्था आहे. जिल्हा परिषदत महापालिकेकडून दोन इंची नळाचे कनेक्‍शन घेण्यात आले आहे, याला चार दिवसात एकदा पाणी येते तेही पुरेसे नसते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार परिसरात तीन बोर आहेत, मात्र आता उन्हामुळे त्यांचेही पाणी आटले आहे. यासाठी दिवसाआड 12 हजार लिटर पाणी टँकरने विकत घेण्याची वेळ जिल्हा परिषदेवर आली आहे. साधारण महिन्याला 20 टँकर मागवावे लागतात, प्रति टँकर दीड हजार रुपयांप्रमाणे महिन्याला 30 हजार याप्रमाणे वर्षाला 3 लाख 66 हजार रुपये नुसत्या टँकरच्या बिलावर खर्च करावे लागतात. 

वास्तविक पाहता जिल्हा परिषदेच्या मालकीचे टँकर दिल्ली गेट येथे गेल्या कित्येक दिवसांपासून जागेवर उभे आहे.जर हा टँकर दुरुस्त केला तर जिल्हा परिषदेचा पाण्यावर होणारा निष्कारण खर्च वाचू शकतो. परंतु या टँकरची बिले काढता येणार नाहीत यासाठी प्रशासनाकडून स्वत:च्या मालकीचे टँकर दुरुस्त करुन त्याचा वापर करुन घेण्यास उत्सुक नाही.

Web Title: Water should be taken by private tanker despite double sided taps