पाण्याचा विसर्ग कमी, पूर ओसरायला सुरवात

भानुदास धामणे
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

नाशिक जिल्ह्यातील धरणांतून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्याने पूर ओसरायला सुरवात झाली आहे. त्यामुळे तालुक्‍यात गेल्या तीन दिवसांपासून पूरपरिस्थितीमुळे भीतीच्या वातावरणात वावरणाऱ्या गोदाकाठच्या गावांतील नागरिकांसह प्रशासकीय यंत्रणेस मोठा दिलासा मिळाला आहे.

वैजापूर (जि.औरंगाबाद) ः नाशिक जिल्ह्यातील धरणांतून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्याने पूर ओसरायला सुरवात झाली आहे. त्यामुळे तालुक्‍यात गेल्या तीन दिवसांपासून पूरपरिस्थितीमुळे भीतीच्या वातावरणात वावरणाऱ्या गोदाकाठच्या गावांतील नागरिकांसह प्रशासकीय यंत्रणेस मोठा दिलासा मिळाला आहे.

नाशिक जिल्ह्यातील धरणांतून ता. चार व पाच ऑगस्ट रोजी पाण्याचा विसर्ग वाढविल्यामुळे गोदावरी नदीने रौद्ररूप धारण करून धोक्‍याची पातळी ओलांडली होती. पुरामुळे गोदाकाठच्या डोणगावसह बाबतरा व नांदूरढोक ही तीन गावे पुराच्या विळख्यात सापडल्याने त्यांचा संपर्क तुटला होता. तसेच, बहुतांश गावांतील घरांसह ग्रामपंचायत कार्यालये, मंदिर व मशिदीमध्ये गोदेचे पाणी शिरले आहे. त्यामुळे प्रशासनास जवळपास 971 जणांचे स्थलांतर करून त्यांना सुरक्षितस्थळी हलवावे लागले. पूरपरिस्थिती उद्‌भवल्यामुळे प्रशासनाने गोदाकाठच्या गावांमध्ये यंत्रणा तैनात केली होती. गोदेच्या पुराने सराला बेटासही विळखा घातला होता. याशिवाय संस्थानाच्या व्यापारी संकुलात पाणी शिरून संरक्षक भिंतीपर्यंत पाणी पोचले होते. दरम्यान, ता. पाच ऑगस्टपासून रात्रीच्या सुमारास नाशकातून पाण्याचा विसर्ग कमी करून एक लाख 33 हजार 988 क्‍युसेक करण्यात आल्याने पूर ओसरायला सुरवात झाली.

सध्या गोदेमध्ये 80 हजार क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असून पूरपरिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. दरम्यान, गोदेच्या पुरामुळे गोदाकाठच्या डोणगावसह अव्वलगाव, नागमठाण, बाजाठाण, शनिदेवगाव, चेंडूफळ, भालगाव, वांजरगाव, लाखगंगा, पुरणगाव, बाबतरा, डाकपिंपळगाव, बाभूळगावगंगा, हमरापूर, सावखेडगंगा, चांदेगाव या गावांतील तीन हजार हेक्‍टर क्षेत्र बाधित होऊन पिकांचे नुकसान झाले आहे. पुरामुळे सार्वजनिक अथवा शासकीय मालमत्तेचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. गोदावरी नदीचा पूर ओसरायला सुरवात झाल्याने गोदाकाठच्या गावांतील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. पूरपरिस्थिती नियंत्रणात असली तरी मात्र प्रशासकीय यंत्रणा गोदाकाठच्या गावांमध्ये सध्याही तैनात आहे.
 

सध्या गोदेमध्ये नाशकातून 80 हजार क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असून पूरपरिस्थिती नियंत्रणात आहे. काल रात्रीच्या सुमारास पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्याने गोदेचे पाणी ओसरायला लागले आहे. गोदाकाठच्या गावांतील तीन हजार हेक्‍टर क्षेत्र पुराने बाधित झाले आहे. याबाबत महसूल प्रशासनाने पंचनामे केले आहेत.
- विनोद गुंडमवार, तहसीलदार, वैजापूर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water speed reduced