तापमानाने बाष्पीभवन अन्‌ अनधिकृत उपशाने घटतोय पाणीसाठा

जालिंदर धांडे
बुधवार, 16 मे 2018

बीड - सरत्या हंगामात जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने सर्वच जलस्रोत तुडुंब भरले. मात्र, वाढत्या तापमानामुळे होणारे पाण्याचे बाष्पीभवन आणि सिंचनासाठी पाण्याचा होणारा अनधिकृत उपसा यामुळे प्रकल्पांतील पाणीसाठा झपाट्याने घटत आहे. मार्च महिन्यात १४४ प्रकल्पांमध्ये असलेला ४७ टक्के पाणीसाठा झपाट्याने घटून आता केवळ १८.४० टक्के इतका कमी झाला आहे.

बीड - सरत्या हंगामात जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने सर्वच जलस्रोत तुडुंब भरले. मात्र, वाढत्या तापमानामुळे होणारे पाण्याचे बाष्पीभवन आणि सिंचनासाठी पाण्याचा होणारा अनधिकृत उपसा यामुळे प्रकल्पांतील पाणीसाठा झपाट्याने घटत आहे. मार्च महिन्यात १४४ प्रकल्पांमध्ये असलेला ४७ टक्के पाणीसाठा झपाट्याने घटून आता केवळ १८.४० टक्के इतका कमी झाला आहे.

जिल्ह्यात माजलगाव व मांजरा या दोन मध्यम प्रकल्पांसह बिंदुसरा, सिंदफणा, बेलपारा, महासांगवी, मेहेकरी, कडा, कडी, रूटी, तलवार, कांबळी, वाण, बोरणा, बोधेगाव, सरस्वती, कुंडलिका, वाघेबाभूळगाव असे १६ मध्यम आणि १२६ लघू असे एकूण १४४ तलाव आहेत. मागील चार दिवसांची पाणीसाठ्याच्या आकडेवारीवर नजर टाकली तर यातील ६४ प्रकल्पातील पाणी जोत्याखाली गेले असून ५४ प्रकल्पांचे पाणी २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे. विशेष म्हणजे सहा प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. 

जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ६६६.३६ मिलिमीटर असून वार्षिक सरासरीच्या १०५ टक्के (६८५ मिलिमीटर) पाऊस झाला. शेवटच्या टप्प्यात झालेल्या जोरदार पावसाने सर्वच तलाव, धरणे तुडुंब भरली; मात्र यानंतर अवघ्या चार ते साडेचार महिन्यांतच पाण्याचा सिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर उपसा झाल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा अर्ध्यापेक्षाही खाली गेला असून जलाशये आता आटू लागली आहेत. 

आजघडीला केवळ तीन प्रकल्पांतील पाणी ५० ते ७५ टक्‍क्‍यांच्यादरम्यान आहे. चालू मे महिन्याच्या आठवड्यातच बेलोरा (ता. बीड), शिंदेवाडी, खडकी (ता. गेवराई) आणि फुलसांगवी (ता. शिरूर) यासह चार प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. यावर्षी जिल्ह्यात उसाचे क्षेत्र ६० हजार हेक्‍टरवर गेले आहे. याशिवाय मोसंबी व इतर फळबाग लागवडही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उसाच्या पिकासाठी व फळबागांसाठी प्रकल्पातील पाण्याचा मोठ्या प्रमाणावर बेकायदा उपसा सुरू आहे. यामुळे प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत चालला आहे. त्यातच बाष्पीभवनाचीही भर पडली आहे. 

प्रकल्पांत केवळ १६४ दलघमी पाणी
बीड जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता ११३७ दलघमी इतकी आहे. या तुलनेत सद्यःस्थितीत या प्रकल्पांमध्ये एकूण ४०४.९८७ दलघमी इतका पाणीसाठा आहे. यापैकीही केवळ १६४.१४२ दलघमी इतकाच साठा हा वापरण्यायोग्य आहे.

Web Title: Water storage is rapidly decreasing due to evaporation