लग्नासाठी पंधरा दिवसांपूर्वीच करताहेत पाण्याची तरतूद

प्रमोद चौधरी
रविवार, 21 मे 2017

टॅंकरसह जारची उपलब्धता; पाण्याअभावी शेतीसह अनेक व्यवसायांवर मंदीचे सावट
 

नांदेड : यंदा जिल्ह्यातील नव्वद टक्के गावांमध्ये पाणी समस्या भेडसावत आहे. घरगुती वापर किंवा पिण्याच्या पाण्यासाठी लढाई असताना लग्न वा इतर समारंभाचे काय? यजमानाला पंधरा दिवस आधीच पाण्याची तरतूद करावी लागते. भोजनासाठी पाण्याचा टॅंकर आणि पिण्याच्या पाण्यासाठी जार उपलब्ध करून द्यावा लागत आहे.

शहरासह ग्रामीण भागामध्ये सध्या लग्नसमारंभाची दूम सुरु आहे. त्यामुळे अनेक गावांतील यजमानांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. सद्यस्थितीमध्ये ग्रामीण भागांत चार ते सहा दिवसांआड, तर काही ठिकाणी चक्क पंधरा दिवसांनंतर पाणी दिले जाते. विहिरींनी तळ गाठल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी हतबल झाले आहेत. दुसरीकडे काही गांवाना ऐन पावसाळ्यातही पाण्यासाठी संघर्ष करावा लागला. तेव्हा उन्हाळ्यात चित्र भयावह आहे. अशा ठिकाणी लग्न वा अन्य कार्यक्रमासाठी टॅंकरमधून पाणी आणल्याशिवाय पर्याय नाही. लग्नविधीसारखे कार्यक्रम कसे पार पाडावेत, असा प्रश्न पडला आहे. शेती व्यवसायासह अन्य व्यवसायात मंदीचे सावट आहे. त्यामुळे विवाह जमल्यावर पहिली चिंता भेडसावते ती पाण्याची. सर्व बाबींची जुळवाजुळवा करावी लागते.

पाण्यासाठी तडजोडीची भूमिका
पूर्वी शंभर टक्के विवाह वधू पित्याकडे होत असत. गेल्या दहा वर्षांपासून पाणीप्रश्नी वरपित्यांना देखील तडजोड करावी लागत आहे. मुलाचे लग्न व्हावे म्हणून वरपिता विकतचे पाणी आणून घरी लग्न ठेवू लागले आहेत. काहींना पाण्याच्या समस्येमुळे जानेवारी, फेब्रुवारीत मुला-मुलींचे साखरपुडा, जागरण गोंधळ, लग्नसमारंभही उरकून घेतले आहेत. जलस्तर प्रचंड खालवल्याने पाणी समस्या आज तरी न मिटणारी आहे. मात्र, लग्नसोहळे व अन्य सर्वच कार्यक्रमांवर टंचाईचा फटका बसला आहे.

Web Title: water stored 15 days for wedding