दोन दिवसांआडच्या नियोजनावर पाणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

औरंगाबाद - शहराला पुन्हा दोन दिवसांआड पाणी देण्यासाठी नियोजन करण्याचे आदेश स्थायी समितीने दहा दिवसांपूर्वी दिले होते; मात्र प्रशासनाने या आदेशाला बगल दिली असून, शहरात येणारे पाणी वाढल्याशिवाय दोन दिवसांआडचे नियोजन कसे करणार? असा सूर पाणीपुरवठा विभागाने काढला आहे. 

औरंगाबाद - शहराला पुन्हा दोन दिवसांआड पाणी देण्यासाठी नियोजन करण्याचे आदेश स्थायी समितीने दहा दिवसांपूर्वी दिले होते; मात्र प्रशासनाने या आदेशाला बगल दिली असून, शहरात येणारे पाणी वाढल्याशिवाय दोन दिवसांआडचे नियोजन कसे करणार? असा सूर पाणीपुरवठा विभागाने काढला आहे. 

शहरातील पाणीपुरवठा गेल्या काही महिन्यांपासून विस्कळित आहे. काही भागांत चार दिवसांआड, तर काही भागांत पाच-सहा दिवसांआड तेही रात्री-अपरात्री पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. गेल्या दोन महिन्यांत पाण्यासाठी वारंवार आंदोलने केली जात आहेत. त्यामुळे प्रशासनाने दोनऐवजी तीन दिवसांआड पाणी देण्याचा निर्णय घेतला होता; मात्र त्यानंतरही नियोजन कोलमडले. तीन दिवसांआड पाणी वेळेवर देता येत नसेल तर पूर्वीप्रमाणेच दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे, असे आदेश स्थायी समितीने दिले होते. त्यानंतर कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी सरताजसिंग चहेल यांना पत्र देऊन नियोजन करण्याचे आदेशित केले; मात्र पाणीपुरवठा विभागाचे नियोजनच सुरू आहे. संपूर्ण शहरात दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीपुरवठ्याच्या वेळात कपात केल्याशिवाय पर्याय नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

पाणी वाढल्याशिवाय उपाय नाही 
गेल्या काही दिवसांपासून जायकवाडी धरणाची पाणीपातळी खालावत आहे. त्यात विद्युत पंपामध्ये शेवाळ, गवत अडकत आहे. त्यामुळे वारंवार व्यत्यय येत असून, शेवाळामुळे सुमारे पाच एमएलडी पाण्याचा उपसा घटला आहे. त्यामुळे पाण्याची तूट भरून काढता-काढता प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहेत. दोन दिवसांआड पाणी देण्याचे नियोजन केल्यास सध्याचा पाणीपुरवठा विस्कळित होईल. नाथसागरातून शहरात येणारे पाणी वाढल्याशिवाय उपयोग होणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: water supply