औरंगाबाद शहराला तीन दिवसांआड पाणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मे 2019

हे घेतले निर्णय
शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याची आयुक्‍तांनी घेतली जबाबदारी
सिडको एन. ५ व  एन. ७ पाण्याच्या टाक्‍यांवरून टॅंकरला पाणी बंद
एमआयडीसीने अडीच एमएलडी पाणी मंजूर केले असताना टॅंकरसाठी घेतले जाते फक्‍त अर्धा एमएलडी यासाठी सर्व टॅंकर एन. १ च्या टाकीवरून भरले जाणार. 
पिण्यासाठीच टॅंकरला पाणी मिळेल, व्यावसायिक वापरासाठी तूर्तास पाणीपुरवठा बंद
पाणीपट्टी वसुलीतून टॅंकर पुरवठादारांचे देयके अदा करा
एन- एकच्या टाकीवरील पाणी पिण्यायोग्य आहे, ज्यांनी पैसे भरले आहेत; मात्र या टाकीवरचे पाणी स्वीकारत नसतील त्यांना त्यांचे पैसे परत केले जातील, त्यांनी खुशाल जारचे पाणी प्यावे.
दादागिरी करून फुकट पाणी घेऊन जाणाऱ्यांना यापुढे दिले जाणार नाही.

औरंगाबाद - आधीच पाणीटंचाईचे दिवस, त्यात शहरातील वितरणाचे नियोजन कोलमडल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. या पाणीबाणीच्या प्रसंगी बुधवारी (ता. आठ) झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्‍तांनी सिडको-हडकोसह शहराला तीन दिवसांआड पाणी देण्यात येईल, असा शब्द दिला. यासाठी पदाधिकाऱ्यांनी आठ दिवसांची डेडलाइन दिली आहे. संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा युद्धपातळीवर सुरळीत करण्यासाठी नव्याने रुजू झालेल्या सहा अभियंत्यांच्या पाणीपुरवठा विभागात बदल्या करण्यात आल्या आहेत.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणातील पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे. आधीच शहराच्या पाण्याच्या गरजेपेक्षा कमी पाणी उपसा केला जातो. सध्या ११५ एमएलडी पाणी शहरात येत असल्याचे दोन दिवसांपूर्वीच झालेल्या बैठकीत पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

त्यात वितरण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. यामुळे शहरवासीयांच्या विशेषतः सिडको हडकोवासीयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या पार्श्‍वभूमीवर बुधवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी आयुक्‍त डॉ. निपुण विनायक यांच्या उपस्थितीत पाणीपुरवठ्यासंदर्भात बैठक घेतली. मंगळवारी आयुक्‍तांच्या दालनापुढे ठिय्या देणारे नगरसेवक नितीन चित्ते, भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, दिलीप थोरात, कीर्ती शिंदे, काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप व प्रशासनातील अधिकारी बैठकीला हजर होते.

काही भागांत तीन दिवसांनंतर तर काही भागांत आठ दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असून, सर्व भागांत तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी यावेळी लावून धरण्यात आली. सिडको-हडकोसाठी गेल्यावर्षीही ३५ एमएलडी पाणी मिळत असूनही गैरसोय झाली नाही, मग यावर्षीच का गैरसोय? असा सवाल यावेळी करण्यात आला. एन-पाचच्या टाकीवरील मीटर बंद असताना कोणत्या आधारे ३५ एमएलडी पाणीपुरवठा करण्याचा दावा करता, असा जाब विचारत चित्ते यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. चर्चेनंतर महापौरांनी जायकवाडीत कमी पाणी असले तरी योग्य नियोजन होत नसल्याने जनतेच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागते. अधिकाऱ्यांतील अहंपणामुळे लोकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. आधी आपसांतील दोष दूर करा, तर पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन होईल.

कोणाच्या दबावाला बळी न पडता कामे करा असे निर्देश दिले. निवृत्त झालेले अभियंता गिरी यांना तातडीने पुन्हा नियुक्त करण्याचे आदेश दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Supply Aurangabad City Water Shortage