आता रेल्वेला देणार मीटर लावून पाणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

लातूर - टंचाईकाळात मिरजहून रेल्वेने शहराला मोफत पाणीपुरवठा करण्यात आला होता. आता पुरेसे पाणी उपलब्ध असल्याने महापालिकेतर्फे मीटर लावून येथील रेल्वे स्टेशनला पाणीपुरवठा केला जाणार आहे. यासाठी रेल्वेतर्फे स्वखर्चाने पाइपलाइनचे काम सुरू आहे. दररोज सव्वादोन लाख लिटर पाणी दिले जाणार आहे. 

तीन वर्षांपूर्वी २०१५ मध्ये मांजरा धरण कोरडे पडल्याने शहराचा पाणीपुरवठाच खंडित झाला होता. त्यावेळी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी तातडीने लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली होती. अवघ्या आठ-दहा दिवसांत मिरज तसेच लातूर येथे सुविधा उपलब्ध करून देऊन रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आला होता. दररोज २५ लाख लिटर पाणी लातूरला रेल्वेने आणले जात होते. या रेल्वेने ११० फेऱ्या केल्या होत्या.

दरम्यान, गेली दोन वर्षं पाऊस चांगला झाला आहे. मांजरा धरणही पाण्याने भरले. यातच येथील रेल्वे स्टेशनला पाण्याची गरज आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने एक पत्र महापालिकेला देऊन पाणी उपलब्ध करण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करण्यात आली आहे. यासाठी आर्वी जलशुद्धीकरण केंद्र ते स्टेशनपर्यंत पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. 

गेल्या काही वर्षांपासून येथे रेल्वेगाड्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे दररोज सव्वादोन लाख लिटर पाणी महापालिका रेल्वेला देणार आहे. यासाठी मीटर लावून बिल आकारले जाणार आहे. यातून रेल्वे स्टेशनला मात्र पाण्याची सोय होणार आहे.

Web Title: Water supply to the metro station by metropolitan meter