पहाटे आले शहरात पाणी...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जून 2019

मला मुक्त करा, कोल्हे यांचे पुन्हा पत्र 
कुचकामी यंत्रणा, कर्मचारी-अधिकाऱ्यांचा अभाव यामुळे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी आयुक्तांना पुन्हा एकदा पत्र देत पाणीपुरवठा विभागातून आपल्याला मुक्त करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एकच विभाग मला देण्यात आला, वाढत्या वयामुळे आता ताण जाणवत असल्याचे कोल्हे यांनी सांगितले.

औरंगाबाद - बारा तासांच्या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले होते; मात्र प्रत्यक्षात नागरिकांना शनिवारी (ता. २९) दुपारपर्यंत पाण्याची वाट पाहावी लागली. शटडाऊनचा वेळ वाढल्यामुळे शहरात पाणी येण्यासाठी पहाटे साडेचार वाजल्याचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी सांगितले. 

महापालिकेच्या जायकवाडी व फारोळा येथील विद्युतपंपाचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत होता. या ठिकाणी रिंग मेन युनिटचे काम करण्यासाठी शटडाऊनची मागणी महापालिकेला केली होती. त्यानुसार शुक्रवारी (ता. २८) बारा तासांचे शटडाऊन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सकाळी आठ ते रात्री आठ अशी शटडाऊनची वेळ ठरली होती; मात्र रात्री नऊ व दहा वाजता फारोळा, जायकवाडी येथे वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर पहिला पंप सुरू करण्यात आला; मात्र संपूर्ण पंप सुरू करून शहरात पाणी येण्यासाठी पहाटेचे साडेचार वाजले. त्यानंतर ज्या भागात पाणी देण्याचे नियोजन होते, त्या भागातील पाण्याच्या टाक्‍या भरून घेत दुपारी नळाला पाणी देण्यात आले. दरम्यान, शटडाऊनच्या काळात महापालिकेनेदेखील अनेक ठिकाणी पाण्याच्या गळत्या बंद केल्या. व्हॉल्व्हची दुरुस्ती करून घेण्यात आली.

पदाधिकारी करणार पाहणी
जायकवाडी धरणातील पाणीपातळी खोलवर जात असल्यामुळे आगामी काळात काय उपाययोजना कराव्या लागतील, याचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी (ता. दोन) महापौरांसह पदाधिकारी पाहणी करणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Supply Morning Aurangabad City