तीन दिवसांआड पाण्याची उद्यापासून अंमलबजावणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

औरंगाबाद - शहराला समान पाणीवाटप करण्यासाठी पाण्याची वेळ एका दिवसाने वाढवून ती तीन दिवसांआड करण्याचा निर्णय महापालिकेचे प्रभारी आयुक्‍त तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मंगळवारी (ता. आठ) रात्री घेतला होता. त्यानुसार प्रशासनाने नवे वेळापत्रक तयार करून आयुक्तांसमोर सादर केले. बुधवारी (ता. नऊ) रात्री आयुक्तांनी त्यावर शिक्कामोर्तब केले असून, आता शुक्रवारपासून (ता. ११)  शहरात तीन दिवसांआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. 

पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी बुधवारी रात्री याबाबत आदेश काढले आहेत. त्यात नमूद करण्यात आले आहे, की जुन्या शहराला पाणीपुरवठा करणारा हर्सूल तलाव आटल्याने त्यातून मिळणारे पाणी बंद झाले आहे. तसेच उन्हाळ्यामुळे जायकवाडी धरणातील पाणी साठा कमी होत असल्याने पंपिंग मशीनचे डिस्चार्ज कमी झाले आहे. त्यामुळे १५६ एमएलडीऐवजी १५० एमएलडीचाच उपसा होत आहे. पाच एमएलडी पाण्याची तूट येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

बोअर आटल्याने मागणी वाढली 
शहरातील विविध भागांतील नागरिक बोअरच्या पाण्याचा वापर करतात. उन्हाळ्यामुळे बोअर आटले असून, महापालिकेकडे पाण्याची मागणी ८ ते १० एमएलडीने वाढली आहे. त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळित होत आहे. शहराला समान पाणी देण्यासाठी सध्याचा पाणीपुरवठा दोनऐवजी तीन दिवसाआड करण्यात येत आहे. शुक्रवारपासून त्याची अंलबजावणी करण्यात येत असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

पाणी दोन दिवसांआडच द्या - महापौर
शहरात तीन दिवसांआड पाणी देण्याचा निर्णय महापालिकेचे प्रभारी आयुक्त उदय चौधरी यांनी मंगळवारी (ता. आठ) रात्री घेतला असताना बुधवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी पाणी दोन दिवसांआडच देण्याचे प्रशासनाकडून नियोजन झाले पाहिजे, असे मत व्यक्त केले. शहरात दररोज २२५ एमएलडी पाण्याची गरज आहे. सध्या १३५ एमएलडी पाणी येते, असे अधिकारी सांगतात. दोन दिवसांचे पाणी २७० एमएलडी एवढे होते. त्यामुळे दोन दिवसांच्या पाण्यावर शहराची गरज भागते. उर्वरित पाणी शिल्लक राहते. तरीही प्रशासनाकडून तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा हट्ट कशासाठी, असा सवालही महापौरांनी केला.

Web Title: water supply municipal