औरंगाबाद : पाणीपुरवठा योजनेची किंमत 1,680 कोटींवर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

शहराच्या नव्या पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव अखेर प्रशासकीय मंजुरीसाठी शासनाला सादर करण्यात आला आहे. जीवन प्राधिकरणाने 1,680 कोटींच्या डीपीआरला (सविस्तर प्रकल्प अहवाल) तांत्रिक मंजुरी दिली आहे. तांत्रिक मंजुरीनंतर योजनेची किंमत वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात असतानाच योजनेची किंमत तब्बल 16 कोटींनी घटली आहे.

औरंगाबाद - शहराच्या नव्या पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव अखेर प्रशासकीय मंजुरीसाठी शासनाला सादर करण्यात आला आहे. जीवन प्राधिकरणाने 1,680 कोटींच्या डीपीआरला (सविस्तर प्रकल्प अहवाल) तांत्रिक मंजुरी दिली आहे. तांत्रिक मंजुरीनंतर योजनेची किंमत वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात असतानाच योजनेची किंमत तब्बल 16 कोटींनी घटली आहे.

 समांतर पाणीपुरवठा योजना गुंडाळण्याच्या निर्णयानंतर महापालिकेने शासनाच्या आदेशानुसार संपूर्ण शहरासाठी पाणीपुरवठा योजनेचा डीपीआर तयार केला आहे. महिनाभरापूर्वी आयुक्तांनी डीपीआरचे नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासमोर सादरीकरण केले होते. म्हैसकर यांनी डीपीआरला जीवन प्राधिकरणची तांत्रिक मंजुरी घेण्याची सूचना केली. त्यानुसार सहा जुलैला 1,696 कोटी 50 लाख रुपयांचा डीपीआर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला होता. दरम्यान, एक टक्का तांत्रिक शुल्काचा विषय समोर आल्यानंतर प्रस्ताव काही दिवस प्रलंबित पडला; मात्र शासनाने एक टक्‍क्‍याची हमी घेतल्यानंतर जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी डीपीआरची तपासणी केली. त्यानंतर प्राधिकरणाने या डीपीआरला तीन दिवसांपूर्वी तांत्रिक मंजुरी दिली होती.

तांत्रिक मंजुरीनंतर प्रकल्पाची किंमत 1680 कोटीवर आला आहे. म्हणजेच किंमत 16 कोटींनी कमी झाली आहे. प्राधिकरणाच्या तांत्रिक मंजुरीनंतर हा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. प्रशासकीय मंजुरीनंतर योजनेची निविदा प्रक्रिया सुरू होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Supply Scheme costs Rs 1,680 crore