भरपावसाळ्यात बावीस टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

बीड - जून महिना उलटत आला तरी अद्यापही जिल्ह्यातील १८९ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील सहा तालुक्‍यांमध्ये २२ टॅंकर सुरू असून या टॅंकरच्या प्रतिदिन ५० फेऱ्या करण्यात येत आहेत. पाणीटंचाईचा प्रश्‍न सुटण्यासाठी आणि खरीप पेरण्या शंभर टक्के होण्यासाठी अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

बीड - जून महिना उलटत आला तरी अद्यापही जिल्ह्यातील १८९ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील सहा तालुक्‍यांमध्ये २२ टॅंकर सुरू असून या टॅंकरच्या प्रतिदिन ५० फेऱ्या करण्यात येत आहेत. पाणीटंचाईचा प्रश्‍न सुटण्यासाठी आणि खरीप पेरण्या शंभर टक्के होण्यासाठी अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत मुबलक प्रमाणात पाऊस झाला. २०१६ मध्ये वार्षिक सरासरीपेक्षाही जास्त म्हणजेच तब्बल १२५ टक्के इतका पाऊस झाला, तर गतवर्षीही वार्षिक सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच १०५ टक्के इतका पाऊस झाला. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाईची परिस्थिती तितकीशी जाणवली नसली तरी काही भागांत मात्र पाणीटंचाईचा प्रश्‍न गंभीर बनला होता. त्यामुळे संबंधित भागात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता.

मात्र जिल्ह्यात अद्यापही मोठा पाऊस न झाल्याने आता २० गावे व चार वाड्यांना २२ टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये १४ शासकीय तर आठ खासगी टॅंकरचा समावेश असून या टॅंकरच्या दर दिवशी ५० खेपा करण्यात येत आहेत. पावसाळा सुरू होऊन व बहुतांश भागात काही प्रमाणात पाऊस होऊनही टॅंकरच्या खेपा कमी झालेल्या नाहीत. 

गेवराई तालुक्‍यात ११, पाटोदा तालुक्‍यात चार, धारूर तालुक्‍यात तीन, बीड तालुक्‍यात दोन तर आष्टी व परळी तालुक्‍यात प्रत्येकी एक टॅंकर सुरू आहे.
टॅंकरद्वारे पाणीपुरवठ्याशिवायही जिल्ह्यात विहिरी व बोअरचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील १६५ गावांतील जलस्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले असून यामध्ये ११ विहिरींचे टॅंकर भरण्यासाठी अधिग्रहण करण्यात आले आहे, तर २३१ विहिरी व बोअरचे गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी अधिग्रहण करण्यात आले आहे. सध्या केवळ ग्रामीण भागातच पाणीटंचाईची परिस्थिती असून शहरी भागात मात्र अद्याप पाणीटंचाईची परिस्थिती नाही. पाणीटंचाईला सामोरे जात असलेल्या गावांची एकूण लोकसंख्या ३२ हजार २८५ असल्याची आकडेवारी प्रशासनाकडे आहे.

या गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा
सध्या गेवराई तालुक्‍यातील धानोरा, जळगाव मंजरा, डिग्रस, रूई, काजळ्याची वाडी, तळवट बोरगाव, धुमेगाव, खेर्डावाडी, सुशीतांडा, मन्यारवाडी, पाटोदा तालुक्‍यातील करंजवन, ढालेवाडी, चिखली, उंबरविहिरा, धारूर तालुक्‍यातील असोला, चांभारतळ तांडा व कान्होबा तांडा, विहिरा तांडा व घोड्याचा मळा तांडा, बीड तालुक्‍यातील बऱ्हाणपूर, ससेवाडी, आष्टी तालुक्‍यातील काकडवाडी तर परळी तालुक्‍यातील सोनहिवरा आदी गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

Web Title: water supply by water tanker