जीर्ण पाण्याची टाकी बनली धोकादायक

चंद्रकांत तारु
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

श्रीक्षेत्र आपेगाव (ता. पैठण) या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मायभूमीत जीर्ण झालेली पाण्याची टाकी पाडण्याची मागणी शासनाकडे ग्रामस्थांकडून केली जात आहे. सदरील टाकी जीव घेणार का? असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहेत.

पैठण (जि.औरंगाबाद ) : श्रीक्षेत्र आपेगाव (ता. पैठण) या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मायभूमीत जीर्ण झालेली पाण्याची टाकी पाडण्याची मागणी शासनाकडे ग्रामस्थांकडून केली जात आहे. सदरील टाकी जीव घेणार का? असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहेत. या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषदेने सदरील टाकी 50 वर्षांपूर्वी बांधली होती. परंतु आता गावाची लोकसंख्या वाढल्यामुळे या जुन्या टाकीची पाणी पुरविण्याची क्षमता कमी असल्याने गावात दुसऱ्या ठिकाणी वाढीव क्षमतेची टाकी महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरणाने बांधली आहे. त्यामुळे या टाकीचा वापर बंद झाल्याने व टाकीचे बांधकाम उखडले गेले असून ती खिळखिळी झाली आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी ही टाकी कोसळण्याची शक्‍यता ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. परंतु टाकी पाडून टाकण्याच्या मागणीकडे ना शासन, ना पुढारी लक्ष देत नसल्याने जीर्ण टाकी उभी आहे. जोरदार पाऊस किंवा वादळी वाऱ्यात टाकी कोसळली तर गावातील मुख्य रस्ता तसेच टाकीखाली व जवळ राहणाऱ्या ग्रामस्थांचा विनाकारण जीव जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यासाठी जुनी झालेली टाकी पाडण्यात यावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

पाण्याची टाकी पाडण्याची अनेकवेळा जिल्हा परिषदेकडे तक्रार केली आहे; परंतु कोणीतरी गावात येतात, पाहणी करून निघून जातात. त्यामुळे या टाकीचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी कार्यवाही करण्याची आवश्‍यकता आहे.
- ज्ञानेश्वर औटे, ग्रामस्थ, आपेगाव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Tank Become Dangerous