पाऊस नाही तरीही तेरा दिवसांपासून टॅंकर बंद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

राज्यात पूर दिसतो, जायकवाडी धरणात पाणी दिसते; मात्र जिल्ह्यात वैजापूर, गंगापूर, औरंगाबाद आणि पैठण तालुक्‍यांत पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे.

औरंगाबाद - राज्यात पूर दिसतो, जायकवाडी धरणात पाणी दिसते; मात्र जिल्ह्यात वैजापूर, गंगापूर, औरंगाबाद आणि पैठण तालुक्‍यांत पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. दुसरीकडे प्रशासनाकडून गेल्या गुरुवारपासून (ता. एक) जिल्ह्यातील टॅंकर बंद केले आहेत. 13 दिवसांपासून जिल्ह्यात टॅंकर बंद आहेत. लोकांनी काय पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करायची का, असा संतप्त सवाल जिल्हा परिषद सदस्यांनी केला. यानंतर अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांनी सर्व स्टाफ कामाला लावा आणि टॅंकरच्या मागणीचा नवीन प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे आदेश दिले. 

अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांनीच टॅंकर बंद झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. रमेश बोरनारे यांनी हा मुद्दा उचलून धरत वैजापूर तालुक्‍यात 91 गावांत टॅंकर सुरू होते. निम्मा पावसाळा होत आला तरी एकाही गावात पाणीपातळी वाढली नाही. गोदाकाठच्या 23 गवांमध्ये पूर आल्याने तिथले होते नव्हते ते पाणीही दूषित झाले आहे. यामुळे पूरबाधित गावांमधून टॅंकर मागणीचे प्रस्ताव आले नाही तरी तिथे टॅंकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी केली. रमेश गायकवाड म्हणाले, की अद्याप जिल्ह्यात पाऊसच नाही तर मग पाण्याचे टॅंकर कसे काय बंद करण्यात आले? प्रशासनाकडून स्पष्टीकरण देताना सांगण्यात आले, की मुदतवाढ संपल्याने एक ऑगस्टपासून टॅंकर बंद केले आहेत. नवीन मागणीसाठी आता 18 पानी माहिती भरून द्यावी लागणार असून, आता नव्याने प्रस्ताव द्यावा लागेल. प्रस्ताव मागवण्याचे काम सुरू आहे. अविनाश गलांडे, मधुकर वालतुरे यांनी चर्चेत सहभाग घेतला. 

चर्चेनंतर श्रीमती डोणगावकर यांनी आधीच 13 दिवसांपासून टॅंकर बंद आहेत. आता 18 पानी माहिती भरून देण्यास किती दिवस घालवणार असा सवाल करून संपूर्ण स्टाफ कामाला लावा आणि कोणत्या गावांमध्ये किती टॅंकरची मागणी आहे याचे जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव देण्याचे आदेश दिले. तसेच सदस्यांच्या सूचनेवरून तोपर्यंत पूर्वी ज्या ठिकाणी टॅंकर सुरू होते त्यांना मुदतवाढ देण्याची मागणी करणारा ठराव बैठकीत घेण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water tanker closed last thirteen days