अनेक अधिकाऱ्यांवर चौकशीत ठपका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

बीड - दुष्काळाचा सुकाळ करणाऱ्या टॅंकर लॉबीने कोट्यवधी रुपयांचा टॅंकर घोटाळा केला. मोठ्या पाठपुराव्यानंतर कार्यकारी अभियंत्यांच्या निलंबनाची घोषणा झाली. या प्रकरणाच्या चौकशीत अनेक अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे.

बीड - दुष्काळाचा सुकाळ करणाऱ्या टॅंकर लॉबीने कोट्यवधी रुपयांचा टॅंकर घोटाळा केला. मोठ्या पाठपुराव्यानंतर कार्यकारी अभियंत्यांच्या निलंबनाची घोषणा झाली. या प्रकरणाच्या चौकशीत अनेक अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे.

मागच्या वर्षी जिल्ह्यात पडलेल्या तीव्र दुष्काळामुळे जिल्ह्यातील बहुतेक भागांत टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. पण, बहुतेक भागात कागदावरच पाण्याच्या खेपा झाल्या. अंबाजोगाई तालुक्‍यात जीपीएस प्रणालीच वापरण्यात आली नाही. तर अनेक ठिकाणी उपअभियंत्यांनी गावांचे ठरवून दिलेल्या अंतरापेक्षा (वास्तविक अंतर) दुप्पट अंतर दाखवण्यात आले. एखादी खेप पोचली तरी तीन ते चार खेपांचे लॉगबुक बनवण्यात आले, अशा स्वरूपाच्या तक्रारी होत्या.

याप्रकरणी अनेक तक्रारींनंतर औरंगाबाद येथील तत्कालीन अप्पर आयुक्त डॉ. अशोक कोल्हे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या प्रकाराची चौकशी केली. यामध्ये आष्टी पंचायत समितीने समितीला दस्तऐवजही दिले नाहीत. तर मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनीही याची चौकशी केली. दोन्ही चौकशांमध्ये अनेक अनियमितता आढळून आल्या. यामध्ये बीड व गेवराईच्या गटविकास अधिकाऱ्यांसह गेवराईचे तत्कालीन तहसीलदार, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, बांधकाम विभागाचे उपअभियंता व अनेक सरपंच व ग्रामसेवकांवर ठपका ठेवण्यात आला. चौकशी समितीने शासनाला अहवाल सादर केल्यानंतर या सर्वांवर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या. पण, त्यावेळी केवळ गेवराईचे तत्कालीन गटविकास अधिकारी व तहसीलदारांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली. तर इतर सर्वांना अभय देण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी गेल्या अधिवेशनातही प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर शुक्रवारी हिवाळी अधिवेशनात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या निलंबनाची घोषणा करण्यात आली. मात्र, इतर दोषींचे काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

Web Title: water tanker scam in beed