टॅंकरने येतंया गढूळच पाणी, पिणार कसं?

सुषेन जाधव/गणेश पिटेकर
शुक्रवार, 3 मे 2019

वन्यजिवांवर परिणाम 
नगर-बीड महामार्गावरून बीडला जात असताना नायगाव मयूर वन्यजीव अभयारण्य लागले. हे अभयारण्य मोरांसाठी प्रसिद्ध आहे. मोरांची संख्या अधिक होती; पण दुष्काळामुळे त्यांची संख्या कमी झाल्याचे अशोक सिरसाठ यांनी सांगितले. ते अभयारण्यात राहतात. रानडुक्कर, हरीण, पक्षी यांवरही परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले.

खिळद (जि. बीड) - दहा दिवसातनं एकदाच पाण्याचा टॅंकर येतोय, तेबी सगळं गढूळच पाणी. ते प्यायचं कसं? असा संताप आष्टी तालुक्‍यातील खिळदच्या (जि. बीड) प्रयागाबाई गर्जे यांनी केला.

आष्टीहून खिळदकडे जात असताना दोन्ही बाजूंनी जनावरांसाठी चारा छावण्या सुरू झालेल्या दिसल्या. मात्र, आजूबाजूचे शेतशिवार भकास व त्यात वाळलेली पिके जणू दुष्काळाची तीव्रता किती आहे, हे सांगताना दिसत होते. या परिसरात रस्त्यांची कामे सुरू होती. कुठेतरी तलाव व धरणांत पाणी दिसेल, ही अपेक्षा बाळगून आमचा पुढचा प्रवास सुरू होता. खिळदला येताच गावाच्या प्रवेशद्वाराला पाण्याचे टॅंकर ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यासाठी उभे होते. जानेवारीपासूनच गावात पाणीटंचाईला सुरवात झाली आहे. मेहकर धरणातून पाच हजार लोकसंख्या असलेल्या खिळदला पाणीपुरवठा केला जातो; पण ते फक्त वापरण्यासाठीच. पिण्यासाठी जारचं पाणी विकत घ्यावं लागतं. येथे साधारण १५ हापसे आहेत. त्यांपैकी फक्त एकाला पाणी राहिलं आहे. साधारण एक हंडा भरण्यासाठी अर्धा तास लागत असल्याचे खिळद गावचे उपसरपंच भाऊसाहेब गर्जे सांगत होते. पाण्याचं टॅंकर बनवून घेण्यासाठी ६० हजार रुपये खर्च आला. ते नगर जिल्ह्यातील कर्जत येथे बनवून घेतलं आहे. त्यासाठी दोन दिवस लागले. पाण्याच्या एका खेपेसाठी ११०० रुपये घेतो, असे पाणी व टॅंकरचे गणित टॅंकरचालक सचिन गर्जे यांनी आम्हाला समजून सांगितलं. 

उपसरपंच श्री. गर्जे यांच्याशी बोलत होतो, तोपर्यंत गावात पाण्याचा टॅंकर आला, काही मिनिटं होत नाही तोच लगेच दोघे-तिघेजण आले आणि आमच्याकडे पाणी येत नाही. तुम्ही चला म्हणत गळ घातली. टॅंकर वाड्या-वस्तींवरून नेमकाच गावात आला होता. श्री. गर्जे यांच्यासोबत टॅंकरकडे गेलो तर महिलांची पाणी भरण्यासाठी एकच झुंबड उडालेली होती.

रोज २० हजार लिटरचे दोन टॅंकर येतात. १४ वाड्या-वस्त्यांना आणि गावात एवढेसे पाणी पुरत नाही. तिसऱ्या टॅंकरचा प्रस्ताव पाठविला आहे. गावात चारा छावण्याही आहेत. तिथंही पाणी लागतं. जूनपर्यंत अशीच परिस्थिती राहील.
- भाऊसाहेब गर्जे, उपसरपंच, खिळद. 

शेजाऱ्या-पाजाऱ्यांच्या हिरीहून, बोअरहून प्यायाला पाणी आणतावं, त्यातच दिस जातो, कामधंदा केलं नाय तर खायचीबी काळजी लागून ऱ्हाती. पाणी भरून महिलांना मणक्‍याचे, कमरेचे आजार झालेत. 
- प्रयागाबाई गर्जे, ग्रामस्थ, खिळद.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Tanker Uncleaned Water Health