२०११ ऐवजी २०१८ च्या लोकसंख्येनुसार गावांना टॅंकर द्या - देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी जिल्ह्यातील सरपंचांशी ऑडिओ ब्रिजद्वारे संवाद साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी जिल्ह्यातील सरपंचांशी ऑडिओ ब्रिजद्वारे संवाद साधला.

बीड - जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्‍यात सर्वांत जास्त १५७, तर वडवणी व परळी वैजनाथ या तालुक्‍यांत सर्वांत कमी नऊ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. जिल्ह्यात एकूण ८५२ टॅंकर्स सुरू आहेत. सुरवातीला २०११ च्या जनगणनेनुसार टॅंकर मंजुरी दिली जात होती. मात्र, आता २०१८ च्या लोकसंख्येच्या आधारावर टॅंकर मंजुरी द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. नऊ) अधिकाऱ्यांना दिले.

टंचाई निवारणार्थ नऊ नळ पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, ११ तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना व ९०४  विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्याची माहितीही श्री. फडणवीस यांनी दिली. 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मुंबई येथील वर्षा निवासस्थानातून ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी यांच्यासह जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्याशी दुष्काळी उपाययोजनेसंदर्भात संवाद साधला.

मुख्यमंत्री म्हणाले, की जनावरांची संख्या लक्षात घेऊन चारा छावण्या सुरू करून पाणीपुरवठा करावा. दुष्काळी-रोहयोची कामे, पाणीपुरवठा योजना तातडीने मंजूर कराव्यात. अशा कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. जिल्ह्यातील ६०० छावण्यांमध्ये चार लाख १८ हजार जनावरे आहेत. 
१४०२ गावांतील सात लाख ८४ हजार १४३ शेतकऱ्यांना ४२८ कोटी ३९ लाख रुपयांची मदत बॅंकेत जमा करण्यात आल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. 

१४ लाख ११ हजार ५६४  शेतकऱ्यांनी खरीप पीकविमा योजनेअंतर्गत नोंदणी केली. या हंगामात नुकसानभरपाईपोटी १४२० कोटी रुपये देण्यात येणार आहेत. त्यापैकी चार लाख ३३ हजार शेतकऱ्यांना १९५ कोटी रुपये रक्कम देण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत दोन लाख ७० हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी ८० हजार शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्यापोटी एकूण १५ कोटी ९५ लाख रुपये देण्यात आल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. बैठकीत अर्जुन शेंडगे, हरिभाऊ पवार, परमेश्वर राठोड, श्रीराम काकडे, तानाजी खामकर, संजय थोटे, वंदना काटे, रेश्‍मा तोडकर, संगीता पाटील, छाया कवाडे, प्रियांका काशीद, दीपा शिरसाठ, कीर्ती चव्हाण, पल्लवी भुते, तारामती माने, सखूबाई सोनवणे, सुनीता जायभाय, सरिता सानप आदी ५० सरपंचांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. गावासाठी जादा पाणी टॅंकर, विहिरींची दुरुस्ती, पाण्याच्या टाकीची दुरुस्ती करणे, तलाव दुरुस्ती, नव्याने चारा छावण्या सुरू करणे, रोहयोची कामे आदी मागण्या या बैठकीत करण्यात आल्या. या मागणी आणि तक्रारींवर तातडीने कार्यवाही करून अहवाल देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

या बैठकीला मुख्य सचिव यू. पी. एस. मदान, पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्‍यामलाल गोयल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, जलसंधारण व रोहयोचे सचिव एकनाथ डवले आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com