पाण्याचा वापर कमी अन्‌ बचतीचीही हमी!

आदित्य वाघमारे
मंगळवार, 14 मे 2019

पाण्याचे फवाऱ्यात रूपांतरण 
किचन आणि वॉश बेसिनमधील नळातून फोमसारख्या पद्धतीने पाणी वाहते आणि बेसिनमध्ये पडताच ते इतरत्र जाते. प्रवाहसुद्धा जास्त असल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जाते. या वाहणाऱ्या पाण्यास स्प्रे अर्थात फवाऱ्यात रूपांतरित करणारे ‘वॉटर सेव्हर यंत्र’ नळाच्या तोंडाशी बसविता येते. अगदी खिशात बसणारे हे यंत्र नळाला बसविण्यासाठी कोणत्याही प्लंबरची गरज पडत नाही, असा दावा या दोघांनी केला आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तयार केले यंत्र; पाणीवापर ९० टक्‍क्‍यांनी कमी
औरंगाबाद - वॉश बेसिन आणि किचनमध्ये असलेल्या नळांमधून वाहणाऱ्या पाण्याचा वेग मिनिटाला २० लिटर असा असतो. हा प्रवाह नव्वद टक्‍क्‍यांनी कमी करणारे यंत्र औरंगाबादेतील प्रणव भोगे आणि आकाश इंगोले या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तयार केले आहे. पाण्याचा प्रवाह घटवून बचतीचे हे अनोखे यंत्र कामात जराही कसूर करीत नाही, हे विशेष!

दिवसेंदिवस वाढणारी पाण्याची भ्रांत पाहता नळातून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह कमी करता आला तर? आणि त्यातून २० लिटर पाण्याएवढेच काम करता येत असेल तर? असे दोन प्रश्न प्रणव आणि आकाश या अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात घोळले आणि त्यातून सुरू झाली शोधयात्रा.

प्रोजेक्‍टवर काम करत असताना तयार झाले हे ‘स्मार्ट वॉटर सेव्हर’ यंत्र. फोम पद्धतीने पाणी बाहेर सोडणाऱ्या नळातून मिनिटाकाठी २० लिटर पाणी वाहते. हा प्रवाह कमी करून तो अवघ्या २ लिटर प्रतिमिनिटावर आणून ९० टक्के पाण्याची बचत होत असल्याचा दावा प्रणव आणि आकाशने केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Use Water Saver Machine