जीर्ण जलवाहिन्यांना फुटीचे ग्रहण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 डिसेंबर 2016

औरंगाबाद - शहराला पाणीपुरवठा करणारी 700 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी रविवारी (ता. 4) सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास बिडकीन येथील साईमंदिराच्या बाजूला असलेल्या आनंद ढाब्याजवळ फुटली. यातून मोठे कारंजे उडून लाखो लिटर पाणी वाया गेले.

औरंगाबाद - शहराला पाणीपुरवठा करणारी 700 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी रविवारी (ता. 4) सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास बिडकीन येथील साईमंदिराच्या बाजूला असलेल्या आनंद ढाब्याजवळ फुटली. यातून मोठे कारंजे उडून लाखो लिटर पाणी वाया गेले.

जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळाल्यानंतर महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून वाहिनीतील पाण्याचा प्रवाह बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. जलवाहिनी मोठ्या प्रमाणावर फुटल्याने दुरुस्तीसाठी किमान 32 तासांचा अवधी लागेल, असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. फारोळा जलशुद्धीकरण केंद्राला पाणी पुरवणारी ही जलवाहिनी साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास फुटल्यानंतर तासाभरापर्यंत येथून पाणी वाहत होते. पालिका पंपगृहातून 700 मि.मी.च्या या वाहिनीचा पाण्याचा प्रवाह बंद केल्यानंतर दुरुस्तीचे काम साधारणतः दीडनंतर हाती घेण्यात आले.

जलवाहिनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने पाण्याच्या जोरदार प्रवाहाने मोठा खड्डा पडला आहे. त्या खड्ड्यातील पाणी काढण्याचे आणि वाहिनी कोरडी करण्याचे काम रात्रीपर्यंत सुरू होते.

जलवाहिनी झाली जीर्ण
1974 मध्ये 700 मिलिमीटर व्यासाची ही वाहिनी टाकलेली असून ती आजघडीला जीर्ण झाल्याने वारंवार फुटते. शिवाय अनेकवेळा रस्त्याची कामे करताना, खोदकाम करताना ती फुटते. यावेळीसुद्धा येथे रस्त्याचे काम करताना जलवाहिनी फुटली. जलवाहिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने या भागातील पाईपच बदलावा लागेल. पाईप अतिशय जुना असल्याने त्याचे भाग तसेच दुरुस्तीसाठी आवश्‍यक यंत्रसामग्री मिळविण्यासाठी वाळूज येथील औद्योगिक वसाहतीत पालिकेकडून शोध घेतला जात आहे. उद्या सोमवारी हे भाग मिळाल्यानंतर वाहिनी जोडली जाईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांनी दिली.

शनिवारीही फुटली होती वाहिनी
शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास कवडगाव येथे 1400 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली होती. त्यानंतर चितेगाव येथे अजंता फार्माजवळ 700 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनीही फुटली. मात्र, पालिकेच्या पथकाने युध्दपातळीवर काम करत या दोन्ही ठिकाणच्या गळत्या दुरुस्त करण्यात यश मिळवले. या दोन्ही जलवाहिन्या फुटल्यामुळे शनिवारी शहराला होणारा पाणीपुरवठा विस्कळित झालेला होता. रात्री साधारणत: 9 वाजेपर्यंत दुरुस्तीकाम पूर्ण करून पाणीपुरवठा लवकरच सुरळीत करण्यात पाणीपुरवठा विभागाला यश मिळाले.

नागरिकांना बसेल निर्जळीची झळ
दोन दिवस सलग वाहिन्या फुटल्याने शहराला ज्या दोन्ही 700 आणि 1400 मिमी व्यासाच्या जलवाहिनीने पाणीपुरवठा होतो, त्यातून अतिशय कमी दाबाने होण्याची शक्‍यता आहे. तर अनेक भागात पाणीपुरवठा होण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे शहराच्या काही भागाला निर्जळीचा सामना करावा लागू शकतो.

Web Title: waterline leakage