लॉकडाऊनचा फटका : निकाह ऑनलाईन पण मिलनाला जिल्हाबंदीचा आडसर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

माजलगाव (जि. बीड) : कोरोना विषाणूच्या फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन, संचारबंदी, जिल्हाबंदी या आदेशाचा एका दाम्पत्याला भलताच फटका बसला आहे. लाकडाऊनमध्ये तंत्रज्ञानाचा आधार घेत ऑनलाईन निकाह केला. परंतु, जिल्हाबंदीच्या आदेशामुळे या नवदाम्पत्याचे मिलन अधुरेच आहे.

महिनाभरापूर्वी सर्वकाही सुरळीत असल्याने अनेक विवाहोच्छुक तरुण - तरुणींचे विवाह जुळले. लग्नाच्या तारखाही निश्चित झाल्या. अचानक कोरोनाचा फैलाव सुरु झाला अन, लॉकडाऊन केल्याने लग्नसमारंभासह सर्वकाही ठप्प झाले. अनेक तरुण, तरुणींच्या जुळलेल्या विवाहाच्या पत्रिकाही वाटप करण्यात आल्याने लग्नघरी जोरदार तयारी सुरु झाली होती. पाहुणेमंडळीही मानपानाचे आहेर घेऊन लग्नाला याच्या तयारीत असताना अचानक कोरोनाचे विघ्न आले. असेच लुखेगाव (ता. माजलगाव) येथील मसीद खान रहीम खान पठाण यांच्या मुलीचा निकाह औरंगाबाद येथील शेख मोहम्मद गयाजोद्दिन मोहम्मद रियाजोद्दीन यांच्या मुलाशी ता. २७ मार्चला निश्चित झाला.

अचानक कोरोनाचा फैलाव सुरु झाल्याने प्रशासनाने संपूर्ण लॉकडाऊन केले आणि जिल्हाबंदीचे आदेश निघाले. परंतु, ठरलेल्याच तारखेला निकाह करण्याचे दोन्ही कुटुंबानी ठरविले. २७ मार्चला औरंगाबाद आणि लुखेगाव येथे मोजकेच नातेवाईक, काझींनी सोशल डिस्टन्सींग पाळत एकत्र आले. दोन्हींकडूनही व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून निकाहची रसम पूर्ण करण्यात आली. यावेळी वधूस देण्यात येणारी मेहेरची रक्कम (स्त्री धन) देण्याचे ऑनलाईनच मान्य करून कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळातही हा अनोखा विवाह सोहळा पार पडला.

लग्नानंतर नववधू तिच्या पतीच्या घरी नांदायला जाते, सर्व कुटुंबातील नातेवाईक मोठ्या थाटात तिची पाठवणी करतात; परंतु पुन्हा एकदा लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने नववधू, वरांच्या मिलनाला कोरोनाची लक्ष्मणरेषा आडवी आली. वधू बीड जिल्ह्यातील असल्याने प्रशासन तिला पतीच्याघरी परजिल्ह्यात (औरंगाबाद) जाण्यासाठी जिल्हा हद्द ओलांडण्याची परवानगी नाही. जिल्हा हद्द ओलांडल्यास अलगीकरण कक्षात ठेवण्याचे सांगण्यात आल्याने वधू - वरांना अद्याप एकत्र येता आले नाही. त्यामुळे ऑनलाईन विवाह होऊनही मिलन मात्र अधुरे राहीले आहे.


कोरोनाची खबरदारी घेत सध्या पद्धतीने लावलेला निकाह दोन्ही कुटुंबासाठी कायम आठवणीत राहणारा आहे. तंत्रज्ञानाच्या युगात इतरांनीही हा आदर्श घ्यायला हवा. 
- मसीद खान, वधूचे पिता.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com