बीड जिल्‍ह्यात बुधवार ठरला उपोषण वार

केज - ग्राहकांना वेळेवर चलन मिळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी बॅंकेसमोर हालगी नाद आंदोलन केले.
केज - ग्राहकांना वेळेवर चलन मिळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी बॅंकेसमोर हालगी नाद आंदोलन केले.

बीड - बीडसह जिल्ह्यातील केज, माजलगाव आणि वडवणी येथे राष्ट्रवादी काँग्रेससह सामाजिक संघटनांनी बुधवारी (ता. २१) वेगवेगळ्या प्रश्‍नांसाठी आंदोलने केली. त्यामुळे जिल्ह्यासाठी बुधवार हा आंदोलन वार ठरला. दरम्यान, केज येथे नागरिकांनी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी ‘रास्ता रोको’ केला. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

केज - राष्ट्रीयकृत व नागरी बॅंकांना मुबलक चलन पुरवठा करण्यात यावा आणि सर्व एटीएम सुरू करावेत यासह इतर मागण्यांसाठी  राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी (ता.२१) सकाळी दहा वाजता शहरातील सर्व राष्ट्रीयीकृत बॅंकेसमोर हालगी नाद आंदोलन करण्यात आले.

शहरातील बॅंक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद आदी राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या शाखेसमोर हे आंदोलन करण्यात आले.  
या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुनील घोळवे म्हणाले, ‘‘नोटबंदीच्या निर्णयापूर्वी सरकारने नियोजन व पर्यायी चलनाची व्यवस्था करायला पाहिजे होती; मात्र तसे झाले नाही. त्यामुळे आता रोकडटंचाईमुळे एटीएम बंद आहेत. बॅंकेत गर्दी वाढत असून, नागरिकांना त्यांचे हक्काचे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे व्यापार मंदावला असून, शेतमालाचे भाव पडत आहेत’’, असे ते म्हणाले. दरम्यान, इतर मान्यवरांनी विचार व्यक्त केले. या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल गदळे, मच्छिंद्र जोगदंड, रविकांत नांदे, लिंबराज फरके, अनंत शिंदे, अतुल इंगळे, काका जाधव, राजाभाऊ आगे, मुन्ना चाळक, शरद इंगळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या आहेत मागण्या 
राष्ट्रीयीकृत व नागरी बॅंकांना मुबलक चलन पुरवठा करण्यात यावा
सर्व एटीएम सुरू करावेत
बॅंकेत चलन देवाणघेवाणीसाठी जादा कक्ष सुरू करावे.
बॅंकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी.
एटीमच्या रांगेत महिला व वृद्धांच्या संरक्षणासाठी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी.
रांगेतील ग्राहकांसाठी बसण्याची, पिण्याच्या पाण्याची आणि सावलीची व्यवस्था करावी.

उमरी रस्त्याप्रश्‍नी केज येथे ‘रास्ता रोको’

केज - शहरातून जाणाऱ्या उमरी रस्त्यावरील अतिक्रमण काढून ३३ फुटांचा रस्ता वाहतुकीस मोकळा करावा, या मागणीसाठी  शेकडो नागरिकांनी बुधवारी (ता.२१) शहरातील शिवाजी चौकात ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. यात महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

शहरातील शिक्षक कॉलनी, अहिल्यादेवीनगर, गणेशनगर, समतानगर, सहयोगनगर आदी वसाहतींच्या रहदारीसाठी उमरी रस्ता हा एकमेव मार्ग आहे. मात्र, येथील शिवाजी चौकातून उमरीकडे निघणाऱ्या रस्त्याचे तोंड अतिक्रमणांमुळे अनेक वर्षांपासून बंद आहे. पंचायत समितीचे प्रवेशद्वारा बंद केल्यामुळे वाहतूक बंद आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. चारचाकी वाहने रस्त्यावरून जात नसल्याने अत्यावश्‍यक सेवासुद्धा बंद पडल्या. विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या वाहनांचीसुद्धा अडचण आहे. शहरवासीयांनी आंदोलनाच्या माध्यमातून अनेकवेळा पाठपुरावा केला; मात्र प्रत्येक वेळी आश्‍वासन देऊन प्रशासनाने वेळकाढू धोरण स्वीकारले. त्यामुळे बुधवारी सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांच्यासह या भागातील महिला, नागरिकांनी शहरातील शिवाजी चौकात ‘रास्ता रोको’ आंदोलन करून संताप व्यक्त केला. तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देऊन ३१ डिसेंबरपर्यंत हा प्रश्‍न निकाली न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनात बाळासाहेब गाढवे, अंगद गाढवे, अमोल बहिरे यांच्यासह शेकडो महिला, नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनामुळे कळंब, मांजरसुंबा, अंबाजोगाई या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने दुपारपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

ग्रामपंचायतीच्या मनमानीविरुद्ध सुर्डीनजीक ग्रामस्थांचे उपोषण

टाकरवण - सुर्डीनजीक (ता. माजलगाव) ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार सुरू असून विविध योजनांअंतर्गत बोगस कामे झाली आहेत. बुधवारपासून (ता.२१) येथील ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत. 

रोजगार हमीअंतर्गत केलेल्या पाणीपुरवठा विहिरीची पहिल्याच पावसात पडझड झाली आहे. त्या विहिरीचा पंचनामा करावा व नव्याने काम सुरू करावे, १३ वा आणि १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत आलेल्या निधीचा हिशेब ग्रामसभेत द्यावा, गावातील सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावावी, गावातील जुन्या व जीर्ण विद्युत तारा बदलून नवीन टाक्‍यावत, पारधी वस्तीवर नवीन सिंगलफेज रोहित्र द्यावे, ग्रामसेवक मनमानी कारभार करीत असून नागरिकांना विविध प्रकारच्या दाखल्यासाठी नागरिकांची अडवणूक केली जाते. संबंधित ग्रामसेवकावर कार्यवाही करावी आदी मागण्या परमेश्‍वर गरड, रामधन पवार, बाबू पवार, शेख उस्मान, आसाराम गरड, गणपत भिक्कम या उपोषणकर्त्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com