दिशाहीन काँग्रेस महाराष्ट्राला काय दिशा देणार? - स्मृती इराणी यांची टीका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

देश आपला, सेना आपली, काश्मिर आपले तरी काँग्रेसचा 370 ला विरोध. हा आंतरराष्ट्रीय मुद्दा आहे, असे सांगून विरोध केला जात आहे. आज देशात काँग्रेस दिशाहीन झाली आहे. अशी दिशाहीन काँग्रेस महाराष्ट्राला काय दिशा देणार? अशी टीका केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी येथे केली.

लातूर ः  देश आपला, सेना आपली, काश्मिर आपले तरी काँग्रेसचा 370 ला विरोध. हा आंतरराष्ट्रीय मुद्दा आहे, असे सांगून विरोध केला जात आहे. आज देशात काँग्रेस दिशाहीन झाली आहे. अशी दिशाहीन काँग्रेस महाराष्ट्राला काय दिशा देणार? अशी टीका केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी येथे केली.

लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार शैलेश लाहोटी यांच्या प्रचारार्थ आयोजित विजयी संकल्प सभेत त्या बोलत होत्या. यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, श्री. लाहोटी, खासदार सुधाकर शृंगारे, भगवंत खुब्बा आदी उपस्थित होते.

काँग्रेसने देशाला विकासापासून वंचित ठेवले. गरीब गरीबच रहावा असा सातत्याने प्रयत्न केला गेला. गरीबांना गॅस, स्वच्छतागृह ते देवू शकले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून गरीबांचा स्तर उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱयांचे कर्ज माफ का केले नाही असा प्रश्न राहूल गांधी उपस्थितीत करीत आहेत. एकट्या महाराष्ट्रात 18 हजार कोटीचे कर्ज माफ झाले. शेतकरी सन्मान योजनेत 24 हजार कोटी मंजूर केले.

राहूल गांधी यांनी मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये खोटे बोलून मते घेतली. ही महाराष्ट्र की पब्लिक है बाबू अशी टीका त्यांनी केली. 
भाजपने आपल्या जाहिरनाम्यात स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्यावा याचा उल्लेख केला आहे. याचा संदर्भ श्रीमती इराणी यांनी आपल्या भाषणात दिला.

दिल्लीत बसून राहूल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सातत्याने अपमान करतात. त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी महाराष्ट्रात येवून बोलावे. त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बलिदान समजले नाही. त्यांची खिल्ली उडवली जाते. राहूल गांधी यांना देशाचा गौरवशाली इतिहास नको आहे, त्यांना फक्त परिवारवाद पाहिजे. त्यांच्यात हिम्मत असेल तर महाराष्ट्रात येवून त्यांनी बोलावे, असे आव्हान श्रीमती इराणी यांनी यावेळी दिले. काँग्रेसला मतदान करणे म्हणजे गरीबांच्या विरोधात मतदान केल्यासारखे आहे.

दिवाळीत आपण घर स्वच्छ करतो. त्यामुळे मतदारांनी आता लातूरसह महाराष्ट्र स्वच्छ करावा. विकासासाठी  लाहोटी यांना विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार सुधाकर शृंगारे, लाहोटी यांचे भाषण झाले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What direction will a directionless Congress give to Maharashtra?