असा होतोय नात्यांचा खून

प्रमोद चौधरी
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

नांदेड:  पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन पतीने पत्नीसह सासू, मेहुणा, मेहुणीचा निर्दयीपणे खून तर नातीच्या आजारपणास पैसे नसल्याने आजीनेच नातीचा आवळलेला गळा, पित्याचा मुलीवर, काकाचा पुतणीवर अत्याचार अशा नानाविध रक्ताच्या नात्यातील मन सुन्न करणाऱ्या घटना घडत आहेत. 

नांदेड:  पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन पतीने पत्नीसह सासू, मेहुणा, मेहुणीचा निर्दयीपणे खून तर नातीच्या आजारपणास पैसे नसल्याने आजीनेच नातीचा आवळलेला गळा, पित्याचा मुलीवर, काकाचा पुतणीवर अत्याचार अशा नानाविध रक्ताच्या नात्यातील मन सुन्न करणाऱ्या घटना घडत आहेत. 

मानवी मन सुन्न करणारे हे प्रकार का वाढले ! माणूस इतका कठोर का बनत आहे ! स्वकियांचे रक्त वाहून तो काय साध्य करत आहे असे अनेक प्रश्‍न आज नागरिकांना पडत आहेत. नैराश्‍य हा आजच्या काळातला आरोग्यविषयक गंभीर प्रश्‍न आहे. शारीरिक आजाराबाबत लोक तातडीने उपचार करून घेतात. मात्र, मानसिक आजाराबाबत तज्ज्ञ मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्यास तयार होत नाहीत. लोक वेडा ठरवतील, बघण्याचा दृष्टिकोन बदलेल अशी भीती त्यांना वाटते. अलिकडे डिप्रेशनशी लढा देणे कठीणच होत आहे. अनेकदा कामाचा ताण आहे. विश्रांती घेऊन वाटेल बरं किंवा पैशाचं टेन्शन आहे; परिस्थिती सुधारली की होईल बरा असा विचार करून डिप्रेशनच्या रुग्णाला डॉक्‍टरकडे नेणे टाळले जाण्याचे प्रमाण अलिकडे वाढले आहे.  

ही आहेत डिप्रेशनची कारणे

नेहमीच्या कामामधला रस निघून जाणे चिडचिड, सतत प्रमाणाबाहेर दुःखी वाटणे ही डिप्रेशनची लक्षणे असतात. अनेकवेळा अपयश आले की माणूस खचतो. चिडचिड करतो. घरखर्चासाठी नोकरी, व्यवसायाची जबाबदारी पार पाडावी लागतेच. शिवाय घरातल्या माणसाच्या इच्छाही पूर्ण कराव्या लागतात. त्यामध्ये कुठे कमतरता राहिली तर मतभेदाची दरी तयार होते. त्यातून संशय कल्लोळ निर्माण होऊन एकमेकांविरुद्ध द्वेष तयार होतात. अशा अवस्थेत गुरफटलेल्या माणसाच्या हातून काही प्रसंगी गंभीर घटना घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सहनशीलता, संयमाचा बांध फुटल्यानंतर तो पशु सारखे वर्तन करू लागतो. तरुणांमध्ये प्रचंड इर्षा आहे. शिक्षण घेऊन चांगली नोकरी मिळत नाही. योग्य पत्नी - पती मिळाला नाही तर मन खचते. अशावेळी स्वतःचे अथवा समोरच्याचे बरेवाईट घडत असते. मनाच्या याच अवस्थेतून सध्या गुन्हेगारी वाढत असल्याचे ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ प्रा. जयराम कोचारे यांनी सांगितले.   

मानसोपचारतज्ज्ञांच्या मते...  

1.  राग, चिडचिडा स्वभाव, स्त्री, पुरुष, लहान मुले छोट्या-छोट्या गोष्टींवरून चिडत असतील, त्यांना संताप होत असेल तर समजा की, ते डिप्रेशनच्या कचाट्यात सापडले आहेत. याचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर होतो. 
2.  माणूस प्रमाणापेक्षा जास्त अमली पदार्थ अथवा मद्याचे सेवन करीत असेल, त्याला कोणी काहीही सांगितले तर तो ऐकत नसेल, तर तो तणावाखाली आहे असे समजावे.
3.  एखाद्या माणसाकडे निर्णय क्षमता नसते. तो सतत द्विधा मनःस्थितीत असतो. आपला निर्णय चुकेल अशी त्याला भीती असते. त्यातून चिडचिड, आदळआपट, राग व्यक्त करणे, सतत डोके धरून बसने ही डिप्रेशनची लक्षणे आहेत.
4.  मित्र, पाहुणे, लोकांच्या गर्दीत मिसळून त्यांच्याशी गप्पा मारणे आवश्‍यक आहे. विचारांची देवाण-घेवाण न करता फेसबुक, व्हॉट्‌सॲपवर मित्र वाढवणारे लोक एकलकोंडे बनतात. मोबाईल, इंटरनेटचा सातत्याने वापर केल्यामुळेही तणाव वाढतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This is what happened