अधिसभेच्या बैठकीपूर्वी प्रा. भोसलेंनी टोचले कान : 'ऑफबीट इतिवृत्त' कुलगुरुंना सादर

अतुल पाटील
Saturday, 9 November 2019

कुलगुरु डॉ. येवले यांच्यासाठी अधिसभेची ही पहिलीच बैठक आहे. प्रा. भोसले यांनी मागील अधिसभा बैठकांचे इतिवृत्तच मांडल्याने कुलगुरु आता कोणती भुमिका घेतात, याकडे विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापकांचे लक्ष आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अधिसभेच्या वार्षिक बैठकीत गोंधळ हा दरवर्षी ठरलेलाच. यावर्षी मात्र, असे होणार नाही अशी चिन्हे आहेत. कारण ऐनवेळच्या विषयावर गोंधळ घालून विषय पत्रिकेला फाटा देणाऱ्यांना आवर घालण्यासाठी एका अधिसभा सदस्यानेच कुलगुरुंना साकडे घातले आहेत. अधिसभेची 16 नोव्हेंबरला बैठक होत असून त्यापूर्वीच अधिसभा सदस्य प्रा. संभाजी भोसले यांनी पत्र लिहले आहे.

VC Pramod Yevle
कुलगुरु डॉ. येवले

प्रा. भोसलेंनी कुलगुरुंना खरमरीत पत्र लिहले असून त्यात बैठकांमध्ये होणाऱ्या चुकीच्या बाबींवर बोट ठेवले आहे. अधिसभा सभागृह विद्यापीठाच्या सर्व क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यासाठी मार्गदर्शन करणारे सभागृह आहे. विद्यार्थी केंद्रबिंदु ठेवून नवीन संकल्पना सुचविणारे तसेच विद्यापीठाच्या लेखा परिक्षण, लेखे, वार्षिक अहवाल यावर गांभिर्याने चर्चा करुन आवश्‍यक त्या ठिकाणी सुधारणा सुचवणारे सभागृह आहे.

 Sambhaji Bhosale BAMU Aurangabad News
प्रा. संभाजी भोसले

गेल्या काही अधिसभा बैठकीत मात्र, विषय पत्रिकांवरील विषयांना बगल देवून ऐनवेळी एखादा विषय निर्माण करायचा आणि त्यावरच तासन्‌तास चर्चा करायची. असे प्रकार होत आहेत. यावर कोणाचेही नियंत्रण नसते. महत्वाच्या विषयांवरही गांभिर्याने चर्चा होत नाही. चर्चा न होताच घाईगडबडीत विषय मंजुर केले जातात. अधिसभेच्या बैठकीच्या अनुशंगाने खालील गोष्टींचा गांभिर्याने विचार व्हावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

कुलगुरु डॉ. येवले यांच्यासाठी अधिसभेची ही पहिलीच बैठक आहे. प्रा. भोसले यांनी मागील अधिसभा बैठकांचे इतिवृत्तच मांडल्याने कुलगुरु आता कोणती भुमिका घेतात, याकडे विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापकांचे लक्ष आहे.

काय केल्याच नेमक्‍या सूचना...
* विषय पत्रिकेवरील क्रमांकानुसारच बैठकीचे कामकाज व्हावे.
* पहिला विषय पुर्ण झाल्याशिवाय दुसऱ्या विषयाला सुरवात नको.
* विषयांवरील चर्चेला वेळेचे बंधन आणि अध्यक्षांचे नियंत्रण असावे.
* सभागृहात महिला सदस्यांची संख्या मोठी आहे. त्यांना संधी मिळावी.
* ठराव विद्यापीठ अधिनियमात येतो का? त्यानंतर अंमलबजावणी व्हावी.
* अधिसभेची वार्षिक बैठक अर्थसंकल्पावर असल्याने सविस्तर चर्चा व्हावी.
* अधिसभा बैठकीचा कालावधी एक दिवसाऐवजी दोन दिवस करण्यात यावा.

अधिसभा बैठकीचा पुर्वानुभव पाहता, भावनिक विषय घेऊन चर्चा होते. यामुळे मुख्य विषय बाजुला पडत आहेत. त्यामुळे अवांतर विषयावर चर्चा टाळण्यासाठी अध्यक्षांनी यावर नियंत्रण ठेवण्यासाठीच हा पत्रप्रपंच केला आहे. विद्यार्थी हित हे केंद्रस्थानी असले पाहिजे.
- प्रा. संभाजी भोसले, अधिसभा सदस्य. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What Will Happen In BAMU Senate Meeting Aurangabad