'इसिस'भरतीसाठी व्हॉट्‌सऍप मेसेज!

'इसिस'भरतीसाठी व्हॉट्‌सऍप मेसेज!
औरंगाबाद - 'इसिस'मध्ये भरती व्हायचे आहे का, तालिबानमध्ये जायचे आहे का, हवे तेवढे पैसे तुला मिळतील...!' अशा आशयाचे संदेश शहरातील तरुणाच्या मोबाईलवर आला अन्‌ तो प्रचंड घाबरला. त्याने तत्काळ पोलिसांना हा प्रकार सांगितला. संदेश पाठविणाऱ्याची कसून शोध घेत चौकशी करण्यात आली. त्या वेळी मेसेज पाठविणारा तरुणाचा जिवलग मित्रच निघाला. त्याने, मित्राला घाबरवण्यासाठी हे कृत्य केल्याचे समोर आले.

निसार (नाव बदलले आहे) हा टीव्ही दुरुस्तीचे काम करतो. त्याला सोमवारी (ता. 16) सायंकाळी मोबाईलमध्ये व्हॉट्‌सऍपवर "इसिसमध्ये भरती होऊ, तुमच्याकडे पैसे नसल्यास, हवे तेवढे पैसे देऊ,' असा संदेश आला. त्यानंतरही अशाच आशयाचे संदेश आले. या प्रकाराने निसार हादरून गेला. त्याने थेट पोलिस आयुक्तालय गाठले. सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती व अन्य अधिकाऱ्यांना त्याने व्हॉट्‌सऍपवरील संदेश दाखवले. याचे गांभीर्य ओळखून बाहेती यांनी लगेचच सर्व यंत्रणा कामाला लावली. सायबर सेल, गुन्हे शाखा व दहशतवादविरोधी पथकाने शोध सुरू केला. मोबाईल लोकेशनवरून पोलिसांनी संदेश पाठविणाऱ्याला गाठले. त्याला ताब्यात घेत चौकशी सुरू केली. त्या वेळी तो निसारचा जिवलग मित्रच असल्याचे उघड झाले. निसारला घाबरवण्यासाठी व मजा घेण्यासाठी असे संदेश पाठविल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी तांत्रिक बाबी तपासल्या व खात्री केल्यानंतरच त्याला सोडून दिले.

दोघांची घनिष्ठ मैत्री..
निसार व संदेश पाठविणारा त्याचा मित्र पूर्वी एकाच दुकानात टीव्ही दुरुस्तीचे काम करीत होते. तेथे त्यांची घनिष्ठ मैत्री झाली. आता ते दोघे वेगवेगळ्या दुकानांत काम करतात. नवीन कंपनीच्या सिमकार्डवरून त्याने निसारला त्रास द्यायचे ठरवून असे कृत्य केले.

असे मेसेज येताच संपर्क साधा
वैजापूर, परभणीतून "इसिस'शी संबंधित तरुणांची धरपकड व मराठवाड्यात दहशतवादाचे संभाव्य जाळे यामुळे पोलिस व तपास यंत्रणा अत्यंत संवेदनशील आहे. अशी प्रकरणे समोर येताच पोलिसांनी यंत्रणा हलवली व तरुणाचा शोध घेतला. सोशल मीडियावरून अशा प्रकारचे संदेश प्राप्त झाल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे.

असे विनोद जिवावर बेतू शकतात
सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांची माथी भडकावून त्यांना इसिसमध्ये भरती करण्यासाठी व देशविघातक कृत्ये करण्याचे प्रयत्न होत आहेत. जानेवारी ते नोव्हेंबर 2016 दरम्यान अशा संशयितांची धरपकड झाली. त्यामुळे मित्रांना घाबरवण्यासाठी असे विनोद करणे गंभीर असून, असे विनोद जिवावर बेतू शकतात, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com