कोणत्या विभागाला मिळणार वाढीव निधी - वाचले पाहिजे

File Photo
File Photo

नांदेड : जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सभापतिपदाचा पदभार घेताच गुरुवारी (ता. २०) सभापती बाळासाहेब रावणगावकर यांनी दोन्ही विभागांचा प्रशासकीय आढावा घेतला. कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या ८० कोटी रुपये निधीमध्ये पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मध्यमातून ७० कोटी रुपये वाढीव मिळणार असल्याने कृषी नविण्यपूर्ण योजनांसह पशुसंवर्धन रुग्णालयांच्या भौतिक सुविधांचे आराखडे तयार करण्याच्या सूचना सभापती रावणगावकर यांनी दिल्या.

जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभागाचा पदभार मिळाल्याने सभापती बाळासाहेब रावणगावकर बैठकांना गैरहजर राहिल्याच्या चर्चेला उधान आले होते. दरम्यान, कामानिमित्त बाहेर असलेल्या सभापती रावणगावकर यांनी गुरुवारी कृषी व पशुसंवर्धन विभागाचा पदभार हाती घेत दोन्ही विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची मॅरेथॉन आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात एकून सोळा तालुके असले तरी, १९९६ पासून पशुसंवर्धन विभागाअंतर्गत नऊ तालुक्यांतील रुग्णालयांस श्रेणी एकचा दर्जा प्राप्त नसल्याची खंत व्यक्त करत शासनदरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन सभापती रावणगावकर यांनी दिले.

पशुसंवर्धन रुग्णालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट -
जिल्ह्यातील श्रेणी एकच्या ७४ रुग्णालयांपैकी २० रुग्णालयांची दुरवस्था झाली आहे. श्रेणी दोनच्या १०९ रुग्णालयांत वीज जोडणी, फर्निचर, संरक्षण भिंत, बोअर, उपचारासाठी शेड, पाण्याचा हौद आदी भौतिक सुविधांअभावी रुग्णसेवेसाठी अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे जिल्हाभरातील श्रेणी एक व श्रेणी दोनच्या रुग्णालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यकतेनुसार नवीन इमारत व भौतिक सुविधा पुरविण्यासाठी अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शासन स्तरावरून कृषी विभगामार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालंबन योजनेंतर्गत ६५ कोटी रुपयांच्या सिंचन विहिरी मंजूर आहेत. बिरसा मुंडा कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत ६.५ कोटी रुपये निधी मंजूर आहे.

प्रायोगिक तत्वावर बजेटमध्ये तरतूद -
माहूर, किनवट या आदिवासीबहूल क्षेत्रासाठी प्रचलित नियमांनुसार अतिरिक्ती निधी वर्ग करण्यात येणार आहे. शेतपिकांची नासाडी करणाऱ्या रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी पिकांभोवती शेतकरी तारेच्या साह्याने वीज प्रवाह सोडतात. त्यामुळे माणवी जिवांसह इतर वन्यजिवांच्या जिवावर बेतण्याच्या प्रकराला आळा घालण्यासाठी सौरप्रवाहाची संकल्पना राबविण्यात येणार आहे. ज्यामुळे केवळ शॉक बसेल; पण रानडुकरांसह इतर प्राण्यांना जीवाशी मुकावे लागणार नाही त्यासाठी प्रायोगिक तत्वावर तीस लाख रुपयांची बजेटमध्ये तरतूद करण्यात येणार. फळबाग शेतीच्या मशागतीला तांत्रिकीकरणाची सांगड घालण्यासाठी प्रायोगिक तत्वावर तालुकानिहाय एक शेतकरी याप्रमाणे ५० टक्के अनुदानावर पॉवर ट्रेलर वाटप करण्याचे धोरण आखण्यात आले.

निधी खर्च अहवालानुसार खातरजमा -
प्रचलित नियमानुसार वर्षअखेरीस खर्च करण्याचा दोन्ही विभागांचा निधी कार्यारंभ आदेशानुसार कामाच्या तपशीलवार माहिती अहवाल मंगळवार (ता. २५) बैठकीत सादर करण्यात यावा. अहवालामध्ये नमूद माहितीची तालुका स्तरावर खातरजमा करून दोषींवर कारवाईची तंबीही सभापती रावणगावकर यांनी दिली. या वेळी जिल्हा विकास कृषी अधिकारी संतोष नादरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com