एचआयव्हीप्रमाणेच पसरतो हा विषाणू, बिग बींना झाली बाधा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

हा विषाणू तोंडावाटे न येता दूषित इंजेक्‍शनच्या मार्गाने किंवा लैंगिक संबंधाने येतो. 

औरंगाबाद - महानायक अमिताभ बच्चन यांना नुकतेच रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे चाहते काळजीत होते. पण, त्यांना जो आजार आहे तो काही आता झाला नाही. वर्ष 1982 पासून त्यांना हा आजार आहे. योग्य आहार, काळजी आणि रोज व्यायाम केल्यास या आजारावर यशस्वी मातही करता येते. हिपॅटायटिस बी (कावीळ ब) असे त्याचे नाव आहे. त्याच्या विषाणूचा प्रसार हा एचआयव्ही विषाणूप्रमाणेच होतो. हा विषाणू तोंडावाटे न येता दूषित इंजेक्‍शनच्या मार्गाने किंवा लैंगिक संबंधाने येतो. 
 
आजार लिव्हरशी संबंधित 
हिपॅटायटीस बीची लागण झालेल्या बहुतेक व्यक्तींमध्ये काही ना काही लक्षणं दिसतात. मात्र, 30 टक्के व्यक्तींमध्ये कुठलीच लक्षणे दिसत नाहीत. तरीही त्यांच्यामध्ये हा विषाणू असतो. हा आजार लिव्हरशी संबंधित आहे. त्याचा विषाणू शांत असून, लागण झाल्यानंतर हळूहळू तो रुग्णांच्या लिव्हरला बाधित करतो. 
 
ही आहेत लक्षणे 
जवळपास 70 टक्के लोकांना लागण झाल्यापासून सहा आठवडे ते सहा महिन्यांत याची लक्षणे दिसायला दिसायला लागतात. ताप आणि थकवा ही मुख्य लक्षणं आहेत. काही जणांना मळमळ, उलट्या, जुलाब, भूक मंदावणे, वजन घटणे अशीही लक्षणं जाणवतात. पोटदुखी, गडद रंगाची लघवी, सांधेदुखी आणि काविळीप्रमाणे पिवळसर त्वचा आणि डोळ्याचा रंग पिवळा
होणे अशीही लक्षणं दिसू शकतात. 
 
कसा होतो हिपॅटायटिस बी? 

  • हिपॅटायटिस बी व्यक्तीचे रक्त इतर व्यक्तीला दिले गेले तर 
  • हिपॅटायटिस बी बाधित व्यक्तीशी असुरक्षित शरीर संबंध ठेवल्यावर 
  • अंमली पदार्थांचं सेवन करताना, एकच सुई अनेकांनी वापरणे 
  • बाधित हत्यारांनी गोंदण किंवा ऍक्‍युपंक्‍चर उपचार घेणे 
  • बाधित मातेकडून प्रसूती वेळी बाळाला या विषाणूची लागण होऊ शकते. 

  
अशी घ्यावी काळजी 

  • चांगली बाब म्हणजे या विषाणूला रोखण्यासाठी लस उपलब्ध आहे. 
  • प्रत्येकाने डॉक्‍टारांच्या सल्ल्याने ही लस टोचून घ्यावी.  आईला जर हिपॅटायटिस बीची बाधा असेल तर जन्मानंतर बाळाला लस दिल्यास बाळ हिपॅटायटिस बीमुक्त होते.  नवजात बालकांना प्राथमिक आरोग्य केंद्रांतून ही लस मोफत दिली जाते.  दर पाच वर्षांनी डॉक्‍टरांच्या सल्ल्याने या लसीचा बूस्टर डोस घ्यावा लागतो.  लस घेतल्यानंतर विषाणूचा धोका टळतो 

या विषाणूची जर लागण झाली तर घाबरणारण्याचे कारण नाही. डॉक्‍टरांच्या सल्ल्याने नियमित औषधोपचार घेतला तर रुग्ण सर्व सामान्यांप्रमाणे दीर्घायुष्य जगू शकतो. मात्र, औषधी घेतली नाही तर यकृताच्या कर्करोगाचा धोका असतो. हिपॅटायटिस बीची लागण टाळण्यासाठी प्रत्येकाने डॉक्‍टरांच्या सल्ल्याने ही लस टोचून घ्यावी. 
- डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, 
मेडिसीन विभागप्रमुख, घाटी रुग्णालय, औरंगाबाद. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: which virus affected Big B?