Loksabha 2019 : औरंगाबादचा खासदार कोण?

Loksabha 2019 : औरंगाबादचा खासदार कोण?

औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता.२३) शहरातील चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील मेल्ट्रॉन येथील इमारतीमध्ये होणार आहे. सकाळी सात वाजता उमेदवार तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सुरक्षित कक्ष (स्ट्राँग रूम) उघडला जाईल. प्रत्यक्ष मतमोजणीला आठ वाजता सुरवात होणार असून, प्रथम टपाली मतपत्रिकेची मोजणी होणार आहे. सायंकाळपर्यंत निकाल हाती येणार असून औरंगाबादचा खासदार कोण असणार, हे कळणार आहे.

गुरुवारी सकाळी ८.३० वाजता सर्व ईव्हीएम मतमोजणी प्रक्रियेला सुरवात होणार असून, एकूण २६ फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यामध्ये मतदारसंघ क्रमांक (कंसात फेऱ्यांची संख्या)  १०५-(२६), १०७ (२४), १०८ (२५), १०९ (२३), १११ (२३), ११२ (२५) याप्रमाणे मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी आयोगाने ब्रजमोहन कुमार आणि देवेंद्र सिंग यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. या मतमोजणी प्रक्रियेत १३० मतमोजणी सहायक, १३७ मतमोजणी पर्यवेक्षक, १३२ सूक्ष्म निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रत्येक मतदारसंघासाठी १४ याप्रमाणे सहा मतदारसंघांसाठी ८४ टेबलांवर २६ फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया करण्यात येणार आहे. ईव्हीएमच्या मतमोजणीनंतर भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार व्हीव्हीपॅटमधील मतपत्रिकांची मोजणी करण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्र अशी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील ३० मतदार केंद्रांवरील व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी करण्यात येणार आहे.

यावर्षी ४,७७५ टपाली मतपत्रिका निर्गमित करण्यात आल्या असून, आतापर्यंत २,११२ टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये ९९२ सैनिकांच्या मतपत्रिका असून उर्वरित मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मतपत्रिकांचा समावेश आहे.

असा असेल गरजेनुसार बदल 
 जालना रोडवर गुरुवारी पहाटे पाच ते मध्यरात्रीपर्यंत गरजेनुसार वाहतूक मार्गात बदल करण्यात येतील. जालनाकडून धुळे, जळगावकडे वाहतूक ही केंब्रिज चौक ते सावंगी बायपास अथवा केंब्रिज चौक ते बीड बायपास रोड, महानुभाव आश्रम चौक या मार्गाने येतील व जातील. 

 नगरकडून जालनाकडे येणारी वाहतूक ही नगरनाका, रेल्वेस्थानक, महानुभाव आश्रम चौक, बीड बायपास, झाल्टा फाटा, केंब्रिज चौक या मार्गाने जातील.

 जळगाव टी, सिडको बसस्थानक इथपर्यंत येणारी वाहतूक हर्सूल मार्गे किंवा शिवाजीनगर, बीड बायपास रोड मार्गाने वळविण्यात येईल. 

 मतमोजणीदरम्यान जालना रोडवरील जळगाव टी पॉइंट ते केंब्रिज नाका या मार्गाचा वावर टाळावा असे आवाहन करण्यात आले आहे.

वाहतुकीत गरजेनुसार बदल
मतमोजणीवेळी जालना रोड व इतर ठिकाणी वाहतूक कोंडीची शक्‍यता लक्षात घेऊन आवश्‍यकतेनुसार वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली. वाहतूक मार्गात प्रभारी अधिकारी आवश्‍यकेतनुसार बदल करतील. त्यात अत्यावश्‍यक सेवा, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका, पोलिसांची वाहने आदींना ही अधिसूचना लागू होणार नाही. मतमोजणीसाठी जय्यत बंदोबस्त शहर पोलिसांनी तैनात केला आहे. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. मतमोजणी दरम्यान वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आला आहे.

चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी ?
चार टर्म खासदार असलेले चंद्रकांत खैरे पाचव्यांदा लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले. त्यांच्यासह काँग्रेसचे उमेदवार आमदार सुभाष झांबड, एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव या चार जणांमध्ये लढत झालेली आहे. यापूर्वी कुणीही कल सांगायचा; मात्र यावेळी नेमका कोण विजयी होईल, हे सांगणे अवघड झाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com