औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त कोण? महापौरांचे राज्यपालांना पत्र

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

 नियमित आयुक्त देण्याची मागणी 

औरंगाबाद- महापालिका निवडणुका तोंडावर असताना आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दीर्घ सुटी घेतल्यामुळे महापालिकेतील वातावरण चांगलेच तापले आहे. विकासकामे ठप्प असून, आकृतिबंध, विविध कामांच्या निविदांवर निर्णय होत नसल्यामुळे महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी (ता. 13) थेट राज्यपालांनाच साकडे घातले. डॉ. निपुण विनायक यांनी वाढीव सुट्यांसाठी अर्ज केल्यापासून महापालिकेचा आयुक्त कोण? हेच आम्हाला माहीत नाही. शहराला नियमित आयुक्त देण्यात यावा, अशी मागणी महापौरांनी या पत्रात केली आहे. 

औरंगाबाद महापालिकेत पुन्हा महिलाराज 

महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक वारंवार सुटीवर जातात. शहरात असले तरी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रातूनच कारभार चालवितात. त्यामुळे महापालिकेत दांडीबहाद्दर अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. महापालिकेची निवडणूक अवघ्या पाच-सहा महिन्यांवर आलेली असताना मुख्यालयात मात्र शुकशुकाट दिसून येत आहे. आयुक्त सुटीवर, अधिकाऱ्यांची दालने रिकामी असल्यामुळे कामे घेऊन आलेल्या नागरिकांना निराश होऊन माघारी फिरावे लागत आहे. गेल्या महिन्यापासून म्हणजेच 25 ऑक्‍टोबरपासून आयुक्त महापालिकेत नाहीत.

दिवाळीच्या पाच सुट्या व नंतर दहा दिवस रजा घेत त्यांनी शहर सोडले. रविवारी (ता. दहा) रजा संपल्यानंतर ते येतील, असा अंदाज बांधला जात होता. मात्र त्यांनी पुन्हा आठ दिवसांची रजा वाढवून घेतली. यामुळे महापालिकेचा कारभार रामभरोसे सुरू आहे. महापौरांकडे अनेक नागरिक समस्या घेऊन येत आहेत. मात्र या समस्या सोडविण्यासाठी प्रशासकीय निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत. आयुक्तच नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. डॉ. निपुण विनायक हे बदलीच्या प्रयत्नात असल्याची चर्चा असून, त्यामुळेच ते रुजू होण्यास टाळाटाळ करीत असल्याचे समजते.

आयुक्तांच्या वारंवारच्या सुट्यांमुळे त्रस्त झालेल्या महापौरांनी आता थेट राज्यपालांना पत्र लिहून आपला संताप व्यक्त केला. महापालिका आयुक्तांनी सुटी वाढविल्यानंतर प्रभारी आयुक्त म्हणून अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे महापालिकेचे आयुक्त कोण? असा प्रश्‍न सध्या पडला आहे. यापूर्वी प्रभारी आयुक्त म्हणून जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे पदभार देण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, आपल्याला नव्याने आदेश प्राप्त झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आयुक्तांची शहरात राहण्याची इच्छा नसेल तर त्यांची बदली करावी व येथे कायमस्वरूपी आयुक्त द्यावा, अशी मागणी राज्यपालांकडे करण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले. पत्राची प्रत मुख्य सचिव, नगरविकास विभागाच्या सचिवांना देण्यात आली आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who is Municipal Commissioner?