या महापालिकेत विरोधी पक्षनेता कोण?

File photo
File photo

नांदेड : दोन वर्षापूर्वी झालेल्या नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत कॉँग्रेसने जंबो बहुमत मिळवून भाजप, एमआयएम, राष्ट्रवादी, शिवसेना या सगळ्यांचीच हवा काढून घेतली होती. भाजपला विरोधात बसावे लागले. मात्र त्यांच्यातही दोन गट झाले आहेत. त्यामुळे महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा अजूनही सुटला नसून आता कोणाची निवड होणार, याकडे आता लक्ष लागले आहे. 

महापालिकेची आॅक्टोबर २०१७ मध्ये निवडणूक झाली. त्यात कॉँग्रेसला ७३, भाजपला सहा तर शिवसेना आणि अपक्ष यांना प्रत्येकी एक जागा मिळाली. कॉँग्रेसला जंबो बहुमत मिळाले, तर भाजपला विरोधात बसावे लागले. भाजपकडून गुरुप्रितकौर सोडी, दीपकसिंह रावत, बेबीताई गुपिले, शांताबाई गोरे, वैशाली देशमुख आणि इंदूबाई घोगरे हे सहा सदस्य निवडून आले. 

एका गटाचा आक्षेप
भाजपकडून विरोधी पक्षनेता म्हणून गुरुप्रितकौर सोडी यांची निवड करावी, असे पत्र तत्कालीन भाजपचे महानगराध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे यांनी दिले, तर दुसरीकडे सोडी वगळता उर्वरित पाच सदस्यांनी त्यास आक्षेप घेतला. भाजपच्या सोडी वगळता पाच सदस्यांनी बैठक घेऊन त्यात गटनेतेपदी दीपकसिंह रावत यांची निवड केली, तसेच त्याची विरोधी पक्षनेते म्हणून निवड व्हावी, यासाठीचा ठरावही मंजूर केला.

न्यायालयाच्या निर्णयामुळे बदल!
तत्कालीन महापौर शीला भवरे यांनी विरोधी पक्षनेतेपदी गुरुप्रितकौर सोडी यांची ता. ११ सष्टेंबर २०१८ रोजी निवड झाल्याचे सर्वसाधारण सभेत जाहीर केले. दरम्यान, भाजपच्या पाच सदस्यांनी आक्षेप घेत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला. त्यानंतर दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयातही त्यांनी धाव घेतली. त्याचा निकाल ता. २१ डिसेंबर २०१९ रोजी लागल्यानंतर आता विरोधी पक्षनेता कोण? असा विषय सर्वसाधारण सभेत समोर आला.

सभागृहात प्रश्न उपस्थित
स्थायी समितीच्या आठ सदस्यांची निवड करत असताना कॉँग्रेसच्या सात सदस्यांची निवड झाली; पण भाजपचा एक सदस्य निवडण्यासाठी विरोधी पक्षनेत्या असलेल्या गुरुप्रितकौर सोडी यांनी स्थायी समितीच्या सदस्यपदासाठी स्वतःचेच नाव सूचवत तसे पत्र दिले. तर दुसरीकडे भाजपचे महानगराध्यक्ष प्रवीण साले यांनी एक पत्र देऊन इंदुबाई घोगरे यांचे नाव सूचवले आहे. त्यामुळे आता या बाबत कोणता निर्णय घ्यावा? असा प्रश्न सभागृहात निर्माण झाला.

महापौरांच्या निर्णयाकडे लक्ष
भाजपचा स्थायी समितीचा सदस्य तसेच विरोधी पक्षनेता कोण? या बाबतचा निर्णय घेण्यासाठी महापौर दीक्षा धबाले यांनी विधी विभागाला सूचना केल्या. त्याचबरोबर सभागृह नेते विरेंद्रसिंग गाडीवाले यांनीदेखील न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अभ्यास करून आणि विधी विभागाशी चर्चा करून महापौरांनी निर्णय द्यावा, असे सांगितले. त्यानुसार आता महापौर काय निर्णय घेणार? याकडे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com